breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अध्यात्माच्या कोंदणातले शैक्षणिक सेवाकार्य

सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ाला आपली कर्मभूमी मानून डॉ. स्वर्णलता भिशीकर गेली तीन दशके तेथील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘शिशू अध्यापिका विद्यालया’ची मुहूर्तमेढ रोवण्यात, सोलापूर शहरातील झोपडपट्टय़ांमधली १८०० साक्षरता केंद्रे, तसेच जिल्ह्य़ातील १८ बाल कामगार पुनर्वसन केंद्रे उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज हराळी येथे ग्रामीण निवासी शाळा सुरू असून येथे चारशे मुले शिक्षण घेत आहेत. एकेकाळी भूकंपामुळे उजाड झालेल्या मराठवाडय़ातील बंजर भूमीवर नवे शिक्षणतीर्थ उभे करणाऱ्या, अध्यात्म व मानसशास्त्र या विषयांत परदेशात अभ्यासपूर्ण व्याख्याने देणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत, डॉ. स्वर्णलता भिशीकर

१९९३च्या किल्लारी भूकंपाच्या निमित्ताने  डॉ. स्वर्णलता भिशीकर यांची मराठवाडय़ाशी जोडली गेलेली नाळ त्यांना कायमस्वरूपी वास्तव्यासाठी लोहारा तालुक्यातील हराळी गावात घेऊन आली आणि एक आगळेवेगळे अध्यात्माचे अधिष्ठान असलेले सामाजिक व शैक्षणिक काम मराठवाडय़ाच्या मरुभूमीवर फुलत गेले. या भूकंपाच्या पाश्र्वभूमीवर सुरू झालेली हराळीतील निवासी शाळा आता परिसरातील शैक्षणिक व ग्रामीण विकासाचे सतत विस्तारणारे केंद्र म्हणून पुढे येत आहे.

सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ाला आपली कर्मभूमी मानून डॉ. स्वर्णलता भिशीकर गेली तीन दशके तेथील शैक्षणिक क्षेत्रात ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून कार्यरत आहेत. सुरुवातीला सोलापुरात सक्रिय असणाऱ्या लताताई किल्लारी भूकंपामुळे मराठवाडय़ाशी जोडल्या गेल्या. गेले दशकभरापासून तर त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्य़ातील हराळी (ता. लोहारा) हा दक्षिण मराठवाडय़ातील परिसर आपल्या शैक्षणिक कार्याचा केंद्रिबदू केला आहे. तेथे गेले दीड तप त्यांचे तेथे वास्तव्य आहे. भूकंपावेळच्या तात्कालिक मदतकार्यातून सुरुवात झालेले त्यांचे हे कार्य फक्त शैक्षणिक पुनर्वसनापाशी न थांबता मराठवाडय़ाच्या मागासलेपणाच्या प्रश्नांच्या मुळाशी असलेल्या कारणांशी जाऊन भिडले आहे.

लताताई भिशीकरांचा जन्म नागपुरातील. जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार कै.चं.प. तथा बापूसाहेब भिशीकर यांच्या कन्या असलेल्या लताताईंवर लहानपणापासून वाचन लेखनाचे वैचारिक संस्कार होणे अगदीच स्वाभाविक होते. पुढे पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांचा संपर्क पुण्यातील विवेकानंदांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानावर आधारित ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक असणाऱ्या डॉ. वि.वि. तथा आप्पा पेंडसे यांच्याशी आला. ‘रूप पालटू देशाचे’ हा ध्यास त्यांनी घेतला व प्रबोधिनीमध्ये युवती कार्यकर्ती म्हणून सक्रिय झाल्या. त्यांनी मानसशास्त्रातील शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण करीत ‘वाचन कौशल्ये’ विषयात पीएच.डी. प्राप्त केली. ज्ञान प्रबोधिनीच्या ‘प्रज्ञा मानस संशोधिका’मध्ये दहा वष्रे वाचनकौशल्ये व आनुषंगिक मानसशास्त्रीय संशोधन व प्रशिक्षणात महत्त्वाचे योगदान केले. अमेरिकेतील ‘इंडियाना युनिव्हर्सटिी ऑफ पेन्सिल्व्हेनिया’ येथे दोन महिने त्यांनीअतिथी व्याख्याता म्हणूनही काम केले.

१९८९ मध्ये अवंतिकाबाई केळकर यांच्या सोलापुरातील ‘बाल विकास मंदिर’ या शाळेचे ज्ञान प्रबोधिनीकडे हस्तांतरण झाले. ही जबाबदारी उचलण्यात प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकत्रे कै. अण्णा ताम्हणकर यांच्या बरोबरीने लताताईंचा सिंहाचा वाटा होता. सोलापुरात एकही पूर्वप्राथमिक शिक्षक प्रशिक्षण केंद्र नाही हे लक्षात घेऊन ‘शिशू अध्यापिका विद्यालया’ची मुहूर्तमेढ रोवण्यात त्यांनी १९९१ मध्ये पुढाकार घेतला.

१९९४ मध्ये सोलापूर शहरातील झोपडपट्टय़ांमध्ये सलग दोन वष्रे १८०० साक्षरता केंद्रे चालविण्यात लताताईंनी पुढाकार घेतला. या कामाची दखल घेतली जाऊन राष्ट्रीय पातळीवर सोलापूर जिल्ह्य़ाला पुरस्कार मिळाला. सोलापूर जिल्ह्य़ात १८ बाल कामगार पुनर्वसन केंद्रे आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी कुमठे येथे साखरशाळा चालू करण्यातही त्यांनी योगदान दिले.

१९९३ मध्ये मराठवाडय़ातील किल्लारी भूकंपानंतरच्या नारंगवाडी, तावशीगड, हराळी या गावांमध्ये मदतकार्यासाठी प्रबोधिनीचे कार्यकत्रे धावून गेले. पाठोपाठ १९९५मध्ये हराळी येथे तेथील ग्रामस्थांच्या आग्रहावरून प्रबोधिनीची ग्रामीण निवासी शाळा सुरू झाली. येथे दोनशेच्या आसपास मुले निवासी आहेत. तितकीच मुले परिसरातील गावांमधून रोज शाळेत येत आहेत. आज एकूण ५६ एकराच्या विस्तीर्ण जागेवर नुसती शाळाच नव्हे तर पाठोपाठ कृषीतंत्र निकेतन उभारण्यात आले आहे. कमी पाण्यावर तग धरू शकणारी पेरू, सीताफळ, आंबा व िलबू यांच्या फळबागा उभ्या आहेत. ग्रामीण स्त्रियांसाठी फळप्रक्रिया उद्योग चालू झाला आहे. येत्या पिढय़ांसाठी आशास्थान असणारे एक नवे शिक्षणतीर्थ या एकेकाळी भूकंपामुळे उजाड झालेल्या मराठवाडय़ातील बंजर भूमीवर उभे राहिले आहे. परिसरातील २० गावांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ‘पूरक शिक्षण’ व ‘छोटे सायंटिस्ट’ तसेच किशोर व किशोरी विकास योजनेतून सुमारे एक हजार ग्रामीण विद्यार्थ्यांना नित्य लाभ होत आहे. सदैव वीज नियमनाला आणि वेळी- अवेळी खंडित वीज पुरवठय़ाला तोंड देण्यासाठी तेथे ४८ किलोवॅट क्षमतेची दोन तर शेतीपंप चालविण्याची ३८ किलोवॅट एक अशी सौर ऊर्जानिर्मिती केंद्रांचीही उभारणी करण्यात आलेली आहे.

सामाजिक कार्याबरोबरच लताताईंच्या विचार चिंतनाला मिळालेले अध्यात्माचे कोंदण ही दुर्मीळ जोड आहे. अध्यात्म व मानसशास्त्र या विषयांतल्या सखोल अध्ययनामुळेच १९९१ मध्ये अमेरिका व कॅनडा येथील ११ प्रमुख शहरांत या दोन्ही विषयांवर त्यांची अभ्यासपूर्ण व्याख्याने व प्रवचने झाली आहेत. विवेकानंद यांचं चरित्र ‘युगनायक’, तसेच ‘चैतन्यसागर रामकृष्ण’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. शिवाय रामकृष्ण मठाचे भूतपूर्व अध्यक्ष स्वामी रंगनाथानंद यांच्या ‘द मेसेज ऑफ उपनिषदाज’ या सहाशे पानी ग्रंथाचा अनुवाद त्यांनी मराठीत केला आहे. रिचर्ड बाक यांचे ‘जोनाथन सीगल’, रवींद्रनाथ टागोर यांची ‘गीतांजली’, स्वामी राम लिखित ‘लिव्हिंग विथ हिमालयन मास्टर्स’, ज्येष्ठ कार्यकर्त्यां विमला ठकार यांचा ‘आत्मोल्हास’ ही त्यांनी मराठीत अनुवादित केलेली आणखी काही पुस्तके. स्वामी विवेकानंदांच्या निवडक संकलित विचारसूत्रांचा तसेच योगी अरिवद व भगिनी निवेदिता यांच्या निवडक इंग्रजी साहित्याचा मराठी अनुवादही त्यांनी वेळोवेळी केला आहे.

ओघवत्या लेखनशैलीबरोबरच रसाळ वाणीचे वरदान लताताईंना लाभले असल्याने पुण्यातील रामकृष्ण मठात सलगपणे गेली काही वष्रे उपनिषदांवरची व्याख्यानमाला, दासबोध, ज्ञानेश्वरी व पतंजली योगसूत्रे  यावर अनेक ठिकाणी नियमितपणे व्याख्याने, प्रवचने व लेखन चालू असतात. बंजर भूमीत ज्ञानगंगा आणणाऱ्या या दुर्गारुपी शक्तीचे कार्य असंच वाढत राहावं हीच सदिच्छा.

  • डॉ. स्वर्णलता भिशीकर
  • मु. हराळी, डाक तोरंबा,
  • ता. लोहारा, जि. उस्मानाबाद – ४१३६०४.
  • दूरध्वनी – ८८८८८०२६२८
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button