breaking-newsमहाराष्ट्र

अत्यंत निर्घृण पध्दतिने सध्या राज्यात कारभार सुरू आहे – उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी प्रश्नावरुन भाजपा सरकारवर सामना संपादकीयमधून टीकास्त्र सोडले आहे. ”राज्यातील शेतकऱ्यांनी विष पिऊन स्वतःचे जीवन संपवले काय किंवा स्वतःच सरण रचून त्या चितेत उडी मारून मरण पत्करले काय, आम्हाला शेतकऱ्यांशी, त्यांच्या आत्महत्यांशी आणि त्यामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांशी काही देणेघेणे नाही. आमची सत्ता आणि माझी खुर्ची टिकणे हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे. एवढ्या निर्घृण पद्धतीने सध्या महाराष्ट्राचा राज्य कारभार सुरू आहे.”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

यवतमाळमधील शंकर चायरे या शेतकऱ्यानं गेल्या आठवड्यात विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. यवतमाळचे दुसरे वृद्ध शेतकरी माधव शंकर रावते यांनी स्वतःचे सरण स्वतःच रचून आत्महत्या केली. यावरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला.

काय आहे आजचे सामना संपादकीय?
यवतमाळ येथे आणखी एका वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केली. माधव शंकर रावते (वय ७१) या शेतकऱ्याने त्याच्या शेतातच चिता रचली व त्यात स्वतःला झोकून दिले. रावते यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळे ते कंटाळले होते. त्यात यावेळी बोंडअळीमुळे कापसाचेही नुकसान झाले. त्यामुळे डोक्यावर असलेले स्टेट बँकेचे ६० हजारांचे कर्ज त्यांना फेडता आले नव्हते. या नैराश्यातून त्यांनी स्वतःची चिता रचली व त्यात उडी घेतली. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठवडाभरातील ही पाचवी शेतकरी आत्महत्या आहे. नापिकी तर आहेच, पण मुख्यमंत्री छाती ठोकून सांगतात तशी कर्जमुक्तीची अंमलबजावणीही धड झालेली नाही. राज्यातील कष्टकरी व शेतकरी बेरोजगार झाला आहे व सरकार उत्सवांत मग्न आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही आता स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत व महाराष्ट्राचे सरकार दोन वर्षे आधीच निवडणुकीच्या तयारीस लागले आहे. कर्जमाफी निर्णयाची ठोस अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीच होती, पण ती योग्य रीतीने पार पडली नसल्याचे दिसते.

 

‘जाऊबाई जोरात’च्या धर्तीवर सत्ताधारी पक्षाचे राजकारण जोरात सुरू आहे, पण त्या जोरबाजीत शेतकरी कमजोर झाला आहे त्याचे काय? अर्थमंत्र्यांनी विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलायला हवे, पण ते युतीच्या भविष्यावर आणि शिवसेनेवर बोलत आहेत. नागपुरात मेट्रो ट्रेन व मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुरू झाले आहे, पण विदर्भात माधव रावतेंसारखे वृद्ध शेतकरी ‘सती’ जात आहेत. त्याची कुणाला ना खंत आहे ना खेद! स्वतः काही करायचे नाही व इतरांनी केले की, त्यावर टीकेच्या गुळण्या टाकायच्या हेच उद्योग सत्ताधाऱ्यांचे सुरू आहेत. १०० बेरोजगारांना रिक्षावाटप करण्याचा कार्यक्रम मुंबईतील एका राजकीय पक्षाने केला. त्याचे कौतुकच करायला हवे, पण ‘‘शंभर रिक्षा वाटून रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे काय?’’ असा फालतू प्रश्न त्यांनी विचारला आहे. मग पंतप्रधान मोदी म्हणतात त्याप्रमाणे डॉक्टर, इंजिनीअर, वकील वगैरेंनी ‘भजी’ तळून रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे काय? या प्रश्नाचेही उत्तर मिळायलाच हवे. महाराष्ट्रात किमान २० लाख रोजगारनिर्मितीचे वचन फडणवीस सरकारने दिले होते.

 

पंतप्रधान मोदी हे सत्तेवर येताच एक कोटी लोकांना रोजगार देणार होते, पण नोटाबंदीमुळे असलेला रोजगारही गेला आहे. सरकार आर्थिक विकासाचा दर कसा वाढला याचे गुलाबी चित्र रंगवत असले तरी प्रत्यक्षात ना कष्टकऱ्यांच्या हातांना काम उरले आहे ना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून उत्पन्न मिळत आहे. त्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यांनी शेतातील उभे पीक नष्ट होत आहे. अस्मानी-सुलतानीच्या कचाट्यात सापडलेल्या सामान्य शेतकऱ्याला मरण जवळ करण्यावाचून दुसरा मार्गच राहिलेला नाही. यवतमाळच्या शंकर चायरे या शेतकऱ्याने गेल्याच आठवड्यात विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आता यवतमाळचे दुसरे वृद्ध शेतकरी माधव शंकर रावते यांनी स्वतःचे सरण स्वतःच रचले व ते ‘सती’ गेले. त्यांच्या राखेतून असंख्य धूलिकण उडतील व राज्यात वणवे पेटवतील. त्या वणव्यात तुमची सत्ता जळून खाक होईल. एका असंवेदनशील पद्धतीने राज्यातील आणि केंद्रातील सरकारचा कारभार सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी विष पिऊन स्वतःचे जीवन संपवले काय किंवा स्वतःच सरण रचून त्या चितेत उडी मारून मरण पत्करले काय, आम्हाला शेतकऱ्यांशी, त्यांच्या नापिकीशी, कर्जबाजारीपणाशी, त्यांच्या आत्महत्यांशी आणि त्यामुळे उद्ध्वस्त होणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांशी काही देणेघेणे नाही. आमची सत्ता आणि माझी खुर्ची टिकणे हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे. एवढ्या निर्घृण पद्धतीने सध्या महाराष्ट्राचा राज्य कारभार सुरू आहे. माधव रावतेंना आमची श्रद्धांजली. त्यांना पकोडे तळायचे कामही हे सरकार देऊ शकले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button