breaking-newsक्रिडा

अखेरच्या विश्वचषकावर छाप पाडता न आल्याचे गेलला शल्य

लीड्स – वेस्ट इंडिजला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात तसेच अखेरचा विश्वचषक संस्मरणीय करण्यात अपयशी ठरल्याने वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल निराश झाला आहे. मात्र यापुढेही वेस्ट इंडिज क्रिकेटच्या भल्यासाठी सदैव उपलब्ध असेन, असे ख्रिस गेलने सांगितले.

‘‘विश्वचषक स्पर्धेत पाच वेळा वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणे, हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. मात्र अखेरच्या विश्वचषकात छाप न पाडता आल्याचे दु:ख होत आहे. येथे येण्यासाठी पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत गेल्या आणि घडत आहेत. विश्वचषक उंचावला असता तर अधिक आनंद झाला असता. पण तरीही मी खेळाचा आनंद लुटला. संघातील अनेक सदस्य युवा खेळाडूंना पाठिंबा देत आहेत. ही खूपच चांगली गोष्ट आहे,’’ असे ३९ वर्षीय गेलने सांगितले.

पुढील महिन्यात होणाऱ्या भारताविरुद्धच्या मालिकेनंतर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे संकेत गेलने गेल्या आठवडय़ातच दिले होते. ‘‘वेस्ट इंडिज क्रिकेटला पुढे घेऊन जाणारा हा संघ आहे. शिमरॉन हेटमायर, शाय होप, निकोलस पूरन यांच्यासारखे चांगले खेळाडू वेस्ट इंडिजला मिळाले आहेत. त्याचबरोबर जेसन होल्डरसारखा युवा कर्णधार त्यांना लाभला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचे भवितव्य उज्ज्वल आहे. शरीरावर अतिरिक्त ताण देण्याची इच्छा नसल्यामुळे ही माझी अखेरची विश्वचषक स्पर्धा असणार आहे,’’ असेही गेल म्हणाला.

गेलची अनुपस्थिती संपूर्ण विश्वाला जाणवेल!

ख्रिस गेल निवृत्त झाल्यानंतर त्याची अनुपस्थिती संपूर्ण विश्वाला जाणवेल, अशा शब्दांत सहकाऱ्यांनी गेलला मानवंदना दिली आहे.

गेल ज्या दिवशी निवृत्त होईल, तो क्रिकेटविश्वासाठी वाईट दिवस असेल. गेलकडून अनेक गोष्टी मी घेतल्या आहेत, त्यापैकी त्याच्या सनग्लासेसची उणीव मला प्रकर्षांने जाणवेल.        – शाय होप

गेलचा दबदबा किती आहे, हे सुरुवातीला मला कळले नव्हते. पण जसजसा त्याच्याबरोबर खेळत गेलो, ड्रेसिंगरूममध्ये गप्पा मारत गेलो, तेव्हा आता गेलची कीर्ती मला खऱ्या अर्थाने समजली. फक्त वेस्ट इंडिज क्रिकेटलाच नव्हे तर जागतिक क्रिकेटलाही त्याची उणीव जाणवेल.        – कालरेस ब्रेथवेट

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button