breaking-newsमहाराष्ट्र

अंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक

अंबरनाथ : फरीदा खान हिला परदेशात पाठवणाऱ्या दोन एजंट्सना अंबरनाथ पोलिसांनी अटक केली आहे. इमरान शेख आणि इकबाल शेख अशी दोन एजंट्सची नावे आहेत. राज्य महिला आयोगाने ठाणे पोलीस आयुक्तांना कारवाईचे आदेश दिले आहेत. मोठ्या पगाराच्या आमिषाने हल्ली अनेकजण आखाती देशात नोकरी करण्यासाठी जातात. मात्र तिकडे गेल्यानंतर काम करताना कशाप्रकारे अनन्वित छळ केला जातो, याचे उदाहरण अंबरनाथमध्ये समोर आले आहे.

अंबरनाथच्या बुवापाड्यात राहणाऱ्या फरीदाच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच. त्यामुळे परदेशात काही वर्ष काम करून परिस्थिती सुधारेल, या आशेनं तिनं एका एजंटच्या मदतीनं काही महिन्यांपूर्वी दुबई गाठले. तिथून तिला ओमानमधील मस्कतला नेऊन अहमद कपिल नामक व्यक्तीच्या घरी घरकामाला ठेवण्यात आले. मात्र 17 खोल्यांच्या अवाढव्य घराची साफसफाई, त्यातल्या 20-25 माणसांच्या जेवणापासून कपडे धुणे, भांडी घासणे, गाड्या धुणे अशी सगळी कामे तिच्या एकटीवर टाकण्यात आली.

एकट्या बाईला इतकी कामे करणे अशक्यच होते, मात्र तरीही काही दिवस फरीदाने हे निमूटपणे सहन करत काम केले. मात्र कामात छोटीशीही चूक झाली तरी शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवून छळ करणे असे प्रकार होऊ लागल्यानंतर फरीदा धास्तावली. या सगळ्या छळाला कंटाळून तिने काम सोडून भारतात परतण्याची मागणी केल्यानंतर तर तिचे तिच्या घरच्यांशी बोलणेही बंद करण्यात आले. त्यामुळे काळजीत पडलेल्या तिच्या घरच्यांनी इकडे राज्य महिला आयोग आणि परराष्ट्र खात्याकडे मदतीची याचना केली. त्याची दखल घेत ओमानमधील भारतीय उच्चायुक्तांनी फरीदाची शोधाशोध सुरु केल्यावर तिच्या मालकाने घाबरुन तिची सुटका केली आणि एजंटच्या मदतीने तिला भारतात माघारी धाडले.

या सगळ्यानंतर आता पैशांच्या हव्यासापोटी आखाती देशात कुणीही जाऊ नका, असे आवाहन फरीदा करतेय याप्रकरणी लोकांना फसवून आखाती देशात गुलाम म्हणून पाठवणाऱ्या स्थानिक एजंटविरोधात गुन्हा दाखल करण्याची तिची मागणी आहे. शिवाय आखाती देशात अशाप्रकारे अनेक भारतीय लोकांना गुलाम म्हणून डांबून ठेवल्याचेही फरीदा सांगते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button