५०० रुपयांत करा जिवाची मुंबई…मुंबईत कुठंही, कितीही फिरा!

मुंबई: तुमच्या खिशात फक्त ५०० रुपये आहेत आणि तुम्हाला मुंबईत फिरायचं आहे, तर किती ठिकाणी आणि किती वेळा फिरू शकता? खूप विचार करावा लागेल ना! पण भविष्यात कदाचित तुमच्यावर तसा विचार करण्याची व खिसा चाचपण्याची वेळ येणार नाही. कारण, लवकरच ५०० रुपयांत लोकल ट्रेननं मुंबईत कुठंही फिरता येणार आहे, तेही महिनाभर!
मुंबई रेल्वे विकास महामंडळानं रेल्वे बोर्डाकडं तसा प्रस्ताव पाठवला आहे. या योजनेअंतर्गत रेल्वे प्रवाशांना ५०० रुपयांचा विशेष पास देण्यात येईल. सेकंड क्लाससाठी या पासाची किंमत ५०० तर, पहिल्या दर्जाच्या डब्यांतील प्रवासासाठी पासाची किंमत १५०० रुपये असेल. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ५०० रुपयांत मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या मार्गांवर महिनाभर कितीही वेळा प्रवास करता येणार आहे. अर्थात, हा पास मासिक पासपेक्षा वेगळा असेल. मासिक पाससाठीचं शुल्क आणि या पाससाठीचं शुल्क वेगळं असेल, असं मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय सांगितलं.
गेल्या आर्थिक वर्षांत रेल्वेनं रेल शिबिराचं आयोजन केलं होतं. त्यात प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी आपापल्या सूचना मांडल्या होत्या. यात उपनगरीय प्रवाशांसाठी एक पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.