हॉस्पिटलमध्ये पेपर देऊन त्याने मिळवले 76 टक्के गुण

पुणे – बोर्डाचे पेपर सुरु असतानाच त्याचा अपघात झाला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला परंतु अशाही परिस्थितीत दवाखान्यातून पेपर देत गणेश ज्ञानोबा हाके या विद्यार्थ्यांने इयत्ता दहावीच्या परीक्षेत 76.40 टक्के गुण मिळवले आहेत. पुणे विभागात अशा प्रकारे पहिल्यांदाच दवाखान्यातून पेपर देण्यात आला आहे.
गणेश हाके हा सर्वसामान्य कुटुंबातील चाकण येथे रहाणारा विद्यार्थी आहे. भामचंद्र माध्यमिक विद्यालयात तो शिकतो. दहावीचे जवळपास सर्व विषयांची परीक्षा त्याने दिली मात्र शेवटचे दोन इतिहास व भुगोल हे पेपर बाकी असताना 19 मार्च रोजी त्याला परीक्षेहून घरी जाताना अपघात झाला. गणेश हा पायी घरी चालला होता. मात्र त्याला एका गाडीने धडक दिली व त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याच दिवशी पालकांनी शाळेकडे धाव घेत त्याची ही व्यथा सांगितली. शाळेनेही तत्परता दाखवत विभागीय बोर्डाशी संपर्क केला व त्याला दवाखान्यातून पेपर देण्याची परवानगी मिळाली.
गणेशचे वडिल हे सुरक्षा रक्षकाचे काम करत असून आई देखील एका कंपनीत कामाला जाते. त्यांच्यावर आलेल्या अडचणीला मुलाने जिद्दीने साथ दिली तसेच पुणे बोर्ड, शाळेतील शिक्षक यांनी साथ दिली त्यामुळे त्याच्या आईवडिलांना आनंद झाला आहे.
कोट
माझ्या मुलाला या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळाले असून 76.40 टक्के गुण मिळाले याचा मला फार आनंद झाला आहे. मात्र मुलाला थोडी आणखीन गुणांची अपेक्षा होती. परंतु तरीही त्याचे वर्ष वाया जाण्यापासून वाचले यामुळे आम्ही सर्वच आनंदीत आहोत.
ज्ञानोबा हाक्के, गणेशचे वडिल
मागील वर्षी मुंबईत एका विद्यार्थ्यांला ऍम्ब्युलन्समध्ये बसून पेपर लिहिण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. यंदा पुण्यात अशी घटना पहिल्यांदाच समोर आली. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी आम्हीदेखील सर्व गोष्टींची खात्री करुन दवाखान्यात निरीक्षकांच्या देखरेखीखाली पेपर लिहिण्यास परवानगी दिली.
बबन दहिफळे, सचिव
पुणे विभागीय शिक्षण मंडळ