हॉल ऑफ फेम टेनिस स्पर्धा : रामकुमारचे विजेतेपद हुकले

- जागतिक क्रमवारीत ४६ने उडी मारत ११५व्या स्थानावर
नवी दिल्ली : एटीपी वर्ल्ड टूरमधील विजेतेपद पटकावण्यात रामकुमार रामनाथन अपयशी ठरला. मात्र अंतिम लढतीतील या झुंजीनंतर जागतिक क्रमवारीत तब्बल ४६ स्थानांची उडी मारत तो ११५व्या स्थानावर पोहोचला आहे.
हॉल ऑफ फेम खुल्या टेनिस स्पर्धेत रामकुमारने अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनला ५-७, ६-४, २-६ अशी लढत दिली. पहिल्या सेटमध्ये अटीतटीच्या झुंजीनंतर तो सेट गमवावा लागल्याने त्याने दुसऱ्या सेटमध्ये उसळी घेतली. दुसरा सेट ६-४ असा जिंकल्यानंतर रामकुमार तिसऱ्या सेटमध्ये तीच लय कायम राखेल अशी शक्यता होती. मात्र स्टीव्हने तिसऱ्या सेटमध्ये दोनवेळा सव्र्हिस भेदत सामना जिंकल्याने रामकुमारला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
यापूर्वी वीस वर्षांपूर्वी केवळ लिएन्डर पेस या एकमेव भारतीय खेळाडूलाच हा चषक पटकावता आला होता. जागतिक क्रमवारीत रामकुमारच्या पुढे आता ८६व्या स्थानी असलेला युकी भांबरी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे.
या आठवडय़ात मी माझे सर्वोत्तम टेनिस खेळलो. अंतिम सामन्यातही पहिले दोन्ही सेट चांगला खेळ झाला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये स्टीव्हने काही अप्रतिम फोरहॅण्ड फटके लगावत मला चकित केले. परंतु मी कामगिरीबाबत समाधानी आहे व यापुढील स्पर्धामध्येही असेच प्रदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे.