breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

हॉटेलमधील स्मोकिंग झोनसाठी स्वतंत्र शुल्क!

मुंबई :  मुंबईतील हॉटेलमध्ये असलेल्या स्मोकिंग झोनसाठी आता हॉटेल व्यावसायिकांना स्वतंत्र शुल्क भरावे लागणार आहे. याबाबतचा ठराव पालिका सभागृहाने मंजूर केला असून याला पालिका प्रशासनही अनुकूल असल्याचे समजते. मात्र याचा सविस्तर अभ्यास करून, निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे याच्या अंमलबजावणीला किमान वर्षभराचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

 मुंबई शहर व उपनगरातील उपाहारगृहांना पालिकेच्या आरोग्य, अनुज्ञापन व दुकाने व आस्थापना या विभागाकडून परवाने देण्यात येतात. यासाठी दुकाननिहाय शुल्क आकारण्यात येते. अलिकडेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार मोठ्या हॉटेलमध्ये स्मोकिंग झोनसाठी स्वतंत्र जागा ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. पण यासाठी पालिका हॉटेल व्यवसायिकांना कोणतेही शुल्क आकारत नाही. त्यामुळे पालिकेला महसूलावर पाणी सोडावे लागत आहे.

मुंबईत सुमारे 1700 हॉटेलला स्मोकिंग झोनचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यात क्लबसह जिमखान्यांचाही समावेश आहे. अजून काही हॉटेल व्यवसायिकांनी स्मोकिंग झोनसाठी अर्ज केला आहे. या अर्जाची अग्निशमन दल व पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून छाननी करून, स्मोकिंग झोनचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. यात स्वतंत्र शुल्काची तरतूद केल्यास पालिकेच्या महसूलात वाढ होईल, असा ठराव भाजपा नगरसेवक अ‍ॅड. मकरंद नार्वेकर यांनी पालिका सभागृहात मांडला होता. याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा देत, ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

दरम्यान पालिका सभागृहाने मंजूर केलेला प्रस्ताव पुढील अंमलबजावणीसाठी पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या चिटणीस विभागाकडून सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button