breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

…हे थंड डोक्‍याने करण्यात आलेले खून: केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह

सुकमा हत्याकांड प्रकरणी राजनाथसिंह यांची प्रतिक्रीया
रायपुर – छत्तीसगडच्या सुकमा परिसरात नक्षलवाद्यांकडून झालेली सीआरपीएफच्या 25 जवानांची हत्या म्हणजे थंड डोक्‍याने करण्यात आलेले खून आहेत अशी प्रतिक्रीया केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली आहे. राजनाथसिंह यांनी आज येथील सीआरपीएफ मुख्यालयात जाऊन शहीद जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होंते. ते म्हणाले की हा भ्याड हल्ला आहे.
छत्तीसगडचे राज्यपाल बलरामजीदास टंडन, मुख्यमंत्री रमणसिंह, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या सह अनेकांनी जवानांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना पुष्पचक्र अर्पण केले. राजनाथसिंह म्हणाले की नक्षलग्रस्त भागात केंद्र व राज्य सरकारतर्फे जी विकास कामे सुरू आहेत त्याच्या विरोधात हा हल्ला आहे. नवी दिल्ली येथे येत्या 8 मे रोजी नक्षलप्रभावित राज्यांतील समस्यांच्या बाबतीत एक उच्च स्तरीय बैठक होणार असून त्यात नक्षल विषयक धोरणाचा आढावा घेतला जाणार आहे. सुकमा येथे झालेला हल्ला हा आमच्यासाठी एक आव्हान आहे. गरज पडली तर आम्ही आमच्या नक्षलविषयक धोरणाचा फेरविचार करू असेही त्यांनी यावेळी नमूद केले. आमच्या शुर जवानांनी दिलेली आत्माहुती वाया जाणार नाही असेही ते म्हणाले. नक्षलवादी हे त्या भागातील गरीब आणि अदिवासींचे सर्वात मोठा शत्रु बनले आहेत. त्यांना त्या भागात विकास होऊ द्यायचा नाही. तथापी ते आपला हेतु साध्य करू शकणार नाहीत असा इशाराहीं गृहमंत्र्यांनी दिला. नक्षलवाद्यांच्या विरोधात जी मोहीम सुरू आहे त्यातून आलेल्या नैराश्‍यातून हा हल्ला झाला असावा असे मतही राजनाथसिंह यांनी व्यक्त केले. हा हल्ला निषेधार्ह आहे असे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी म्हटले आहे. असे हल्ले झाले तरी त्या भागातील विकास कामे चालूच राहतील असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button