हेरगिरीच्या आरोपावरून बहरीनची पाक नागरिकांना व्हिसाबंदी

नवी दिल्ली – पाकिस्तानचे मित्रराष्ट्र असलेल्या बहरीनने दीर्घ काळापासून पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणे बंद केले असल्याची माहिती भारतीय गुप्तचर संस्थेच्या एका अहवालात देण्यात आलेली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय याला कारणीभूत आहे. आयएसआय केवळ भारतासाठीच नाही, तर जगातील अनेक देशांसाठी डोकेदुखी बनलेली आहे. आणि त्यामुळे पाकिस्तनचे मोठेच नुकसान होत आहे.
इराणसाठी हेरगिरी करण्याबाबत अनेक पाकिस्तानी नागरिकांची नावे समोर आल्यानंतर सौदी अरबच्या सल्ल्यानुसार बहरीनने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घातलेली आहे. या बंदीनुसार पाकिस्तानमधून बहरीनला जाऊ इच्छिणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांचा कोणत्याही प्रकारे आयएसआयशी संबंध असल्याचे आढळताच त्यांचा व्हिसा रद्द करण्यात येणार आहे. अशीच परिस्थिती राहिली तर सौदी अरबदेखील पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यावर बंदी घालण्याच्या विचारात आहे.
पाकिस्तानच्या राजकारणात सौदी अरब, संयुक्त अरब आमीरात आणि अन्य खाडी देशांचे महत्त्व मोठे आहे. परंतु हे देश पाकिस्तानबाबतचे आपले राजनैतिक धोरण बदलण्याच्या तयारीत आहेत.