हेमंत करकरे यांनी एटीएस प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल सुमित्रा महाजन यांना शंका

नवी दिल्ली | भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या पाठोपाठ आता लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हेमंत करकरे यांनी दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख म्हणून केलेल्या कामाबद्दल सुमित्रा महाजन यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना शंका व्यक्त केली आहे. सुमित्रा महाजन यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
सुमित्रा महाजन यांनी यावेळी हेमंत करकरे यांच्या कामाबद्दल शंका उपस्थित करताना काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर देखील टीका केली आहे. त्यामुळे दिग्विजय सिंह यांनी सुमित्रा महाजन यांच्या टीकेला ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. ‘सुमित्रा ताई, तुम्ही माझे नाव अशोक चक्र विजेत्या हेमंत करकरे यांच्यासोबत जोडत आहात याचा मला अभिमान वाटतो. तुमचे साथीदार भले त्यांचा अपमान करू देत परंतु मला अभिमान आहे कि मी कायमच देशहित, राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा सन्मान करणाऱ्या लोकांसोबत आहे”, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
सुमित्रा ताई, मुझे गर्व है कि अशोक चक्र विजेता शहीद हेमंत करकरे के साथ आप मुझे जोड़ती हैं।आपके साथी उनका अपमान भले ही करें, मुझे गर्व है कि मैं सदैव देशहित, राष्ट्रीय एकता और अखंडता की बात करने वालों के साथ रहा हूँ। https://t.co/6vD0i0UZF2
— digvijaya singh (@digvijaya_28) April 29, 2019
हेमंत करकरे यांच्याविषयी यापूर्वी साध्वी प्रज्ञा यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले होते. “हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने अडकवले. मी त्यांना म्हटलेच होते की, तुमचा सर्वनाश होईल. शेवटी ते दहशतवाद्यांकडून मारले गेलेच. त्यांचा मृत्यू त्यांच्या स्वत:च्या कर्मानेच झाला,” असे संतापजनक वक्तव्य प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. प्रज्ञा सिंह ठाकूरच्या या वक्तव्यानंतर भाजपला सर्वच स्तरातील लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. परंतु तरीही पंतप्रधान मोदींसह भाजपकडून साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीचे कायमच समर्थन करण्यात आले आहे.