हिमालय पूल दुर्घटना प्रकरण : नीरज देसाईंविरोधात आरोपपत्र

मुंबई : हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेले महापालिकेचे तांत्रिक सल्लागार नीरज देसाई यांच्याविरोधात गुरुवारी आझाद मैदान पोलिसांनी दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. पुलाची संरचनात्मक तपासणी करून चुकीचा निष्कर्ष दिल्याने अपघात घडल्याचा ठपका आरोपपत्रात ठेवण्यात आला आहे.
देसाई यांच्यासह पालिकेचे तीन आजी-माजी अभियंते अटकेत आहेत. सेवेत असलेल्या दोन अभियंत्यांविरोधात खटला चालविण्याची परवानगी मागणारा प्रस्ताव पोलिसांनी महापालिकेकडे पाठवला आहे. पालिकेकडून मंजुरी मिळाल्यावर त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
आझाद मैदान पोलिसांनी पूल दुर्घटनेनंतर देसाईंविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला होता. पोलीस तपासात देसाई यांच्या कंपनीने केलेली संरचनात्मक तपासणी सदोष आढळली. संरचनात्मक तपासणी करताना पुलाखालील वाहतूक पूर्णपणे बंद करणे आवश्यक होते. हा नियम देसाई यांनी पाळला नाही, असे तपासातून स्पष्ट झाल्याचा दावा पोलीस करतात. संरचनात्मक तपासणी चुकीच्या पद्धतीने केल्यास किंवा चुकीचा अहवाल, निष्कर्ष दिल्यास पूल कोसळू शकेल, जीवीतहानी होऊ शकेल याची जाणीव देसाई यांना होती. मात्र त्यांनी हलगर्जीपणे सदोष तपासणी केली, असे या आरोपपत्रात नमूद आहे.
या आरोपांना स्पष्ट करणारे १६४ साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात आहेत. जीओ डायनामिक्स कंपनीचे प्रमुख रवी वैद्य यांच्याही जबाबाचा आरोपपत्रात समावेश आहे.
अटकसत्राविरोधात पालिका अभियंत्यांचे आंदोलन
मुंबई : हिमालय पूल दुर्घटना प्रकरणी दोन अभियंत्यांपाठोपाठ पूल विभागातील निवृत्त मुख्य अभियंता शीतलाप्रसाद कोरी यांना झालेल्या अटकेच्या विरोधात पालिका अभियंत्यांमध्ये असंतोष असून अटकसत्राच्या विरोधात कृती समितीच्या बैठकीमध्ये अभियंत्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. सोमवारपासून ‘नियमानुसार काम आंदोलन’, तसेच बुधवार, गुरुवार व शुक्रवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत एकमुखाने घेण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाने कार्यकारी अभियंता अनिल पाटील व सहाय्यक अभियंता संदीप काकुळते यांना निलंबित केले होते. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी सोमवारी शीतलाप्रसाद कोरी यांना अटक केली. पालिकेतील विविध प्रकरणांमधील पोलीस कारवाई संदर्भात चर्चा करण्यासाठी अभियंत्यांच्या कृती समितीची गुरुवारी सायंकाळी शिरोडकर हॉलमध्ये एक बैठक झाली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
नालेसफाई, रस्ते घोटाळा आदींमध्ये पोलिसी कारवाई झाल्यामुळे अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने थेट पोलिसी कारवाई करू नये. पालिकेच्या सेवा नियमानुसार कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी या बैठकीत करण्यात आली. पोलीस कारवाईच्या निषेधार्थ पालिकेतील अभियंते ‘नियमानुसार काम आंदोलन’ करणार आहे. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर अभियंते कार्यालयातून निघून जातील, असे अभियंत्यांच्या संघटनेचे पदाधिकारी साईनाथ राजाध्यक्ष यांनी सांगितले.