हितेंद्र ठाकूरांचा पाठिंबा घेऊन गद्दारांना धडा शिकवू: राष्ट्रवादी

मुंबई: कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या निरंजन डावखरे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने ठाण्याचे नगरसेवक नजीब मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीसाठी भाजपविरोधात काँग्रेस,राष्ट्रवादी, शेकाप एकत्र येणार असल्याचा दावा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गद्दाराला धडा शिकवण्याची भूमिका आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बहुजन विकास आघाडीकडेही पाठिंबा मागितला आहे. डावखरे आणि हितेंद्र ठाकूर यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पण तरीही हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा सुरु केली आहे. हितेंद्र ठाकूर यांनी भाजप उमेदवाराला म्हणजेच निरंजन डावखरेंना मदत करु नये, राष्ट्रवादीला करावी” असं आवाहन केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
निरंजन डावखरेंची पक्ष सोडण्याची तयारी एक वर्ष आधीपासूनच सुरु होती. म्हणून राष्ट्रवादीच्या मतदारांना निरंजन डावखरेंनी मतदार म्हणून नोंदणी करु दिली नाही. पण कमी दिवस असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस मेहनत करणार. गद्दारांना धडा शिकवावा असं कार्यकर्त्यांना वाटते, असं आव्हाड म्हणाले.