हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवूड म्हटल्याने अपमान

नवी दिल्ली : हिंदी चित्रपटसृष्टीला ‘बॉलिवूड’ असं संबोधणं अवमानकारक आहे, त्याऐवजी नवीन पर्यायी शब्द तयार करावा, असे आवाहन भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केले आहे. ‘काही दिवसांपूर्वी मी प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांना भेटलो होतो. बॉलिवूड हा शब्द परदेशी मीडियाने भारतीय चित्रपटसृष्टीला हिणवण्यासाठी वापरला, असं बोलता बोलता घई म्हणाले. आपल्याकडे दादासाहेब फाळके, सत्यजीत रे यांच्यासारखे दिग्गज होऊन गेले. त्यामुळे बॉलिवूड म्हणून हिणवलं जाणं स्वाभिमानाला धक्का पोहचवणारं आहे.’ असं कैलाश विजयवर्गीय म्हणाले.
‘बॉलिवूड.. त्याचप्रमाणे कॉलिवूड, मॉलिवूड अशी त्याची प्रादेशिक नावं वापरणं बंद व्हावं. याऐवजी त्या-त्या भाषेच्या नावाचा वापर व्हावा, यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी पावलं उचलावीत, अशी मागणी करणारं पत्र मी लिहिणार आहे.’ असंही विजयवर्गीयांनी सांगितलं.