breaking-newsमहाराष्ट्र
‘हा’ तर निवडणूक आयोगाचा विजय- शिवसेना

मुंबई : भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विजयानंतर शिवसेनेने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. पालघरमध्ये मतदान संपल्यानंतर १२ तासांच्या आतच निवडणूक आयोगानं मतांची टक्केवारी बदलल्याचा आरोप करत हा भाजपचा विजय नसून, निवडणूक आयोगाचाच विजय आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला.
शिवसेना आणि भाजपनं प्रतिष्ठेच्या केलेल्या पालघर पोटनिवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला असून, भाजप उमेदवार राजेंद्र गावित हे विजयी झाले आहेत. त्याचवेळी शिवसेनेनं भाजपवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. शिवसेनेनं पालघरमध्ये आपली ताकद दाखवून दिली आहे. दोन लाखांहून अधिक मते मिळवली आहेत, असे राऊत म्हणाले. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी, काँग्रेस, माकप आणि शिवसेनेनेही आपापले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे मतविभाजन झाले. त्याचा फायदा शिवसेनेला झाला, असंही ते म्हणाले.