breaking-newsपुणेमहाराष्ट्रमुंबई

हवामान बदलाचा सर्वाधिक फटका महिलांच्या आरोग्याला

  • धोक्‍याची चाहूल

  • युनायटेड नेशन्स “वुमेन वॉच’च्या संशोधनातील निष्कर्ष

पुणे – गेल्या काही वर्षांत हवामान बदल हा जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. या हवामान बदलामुळे पर्यावरणतील विविध घटकांवर परिणाम होत असल्याचे विविध संशोधनात नमूद केले आहे. परंतु युनायटेड नेशन्स या जागतिक संघटनेच्या “वुमेन वॉच’तर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनात, हवामान बदलामुळे महिलांच्या आरोग्यावर जास्त विपरित परिणाम होत असल्याचे नोंदविण्यात आले आहे.

हवामान बदलामुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होतोच, पण त्याहीपेक्षा जास्त परिणाम हा जीवनशैलीतील बदलांमुळे होत आहे. परंपरागत खाद्यपदार्थ आणि जीवनशैली यापासून दुरावत असल्याने नागरिकांच्या शारीरिक क्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे हवामानात जराही बदल झाला, तर त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होतो. हा परिणाम टाळण्यासाठी स्थानिक पर्यावरणाला अनुरूप अशी जीवनशैली आत्मसात केली पाहिजे. तसेच स्वत:च्या आरोग्याला प्राधान्य देत, आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केले पाहिजे.
– डॉ. श्रीनाथ कवडे, पर्यावरण अभ्यासक

युनायटेड नेशन्सतर्फे हवामान बदलामुळे अचानकपणे होणारे भूकंप, पूर, वादळ, दुष्काळ यांसारख्या समस्या प्राधान्यक्रमावर ठेवण्यात आल्या आहे. या परिस्थितीचा प्रादेशिक परिणाम विशेषत: विकसित आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये विविध आर्थिक आणि सामाजिक स्तरांवर नेमका काय परिणाम होतो, याबाबत अभ्यास केला जात आहे. याच अभ्यासांतर्गत हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संसाधनांच्या कमतरतेचा परिणाम पुरूषांपेक्षा जास्त महिलांवर होत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये श्‍वसनाच्या समस्या, उष्णतेमुळे होणारे आजार, हृदय, फुफ्फुसाचे आजार तसेच मुदतीपूर्वी बाळंतपण, जन्मलेल्या बाळाचे वजन कमी असणे, कॅन्सर अशा विविध समस्या यामुळे उद्‌भवत असल्याचे यातून पुढे आले आहे.

प्रत्येक परिवारात महिला ही काळजीवाहकच्या भूमिकेत असते. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या महिला स्वत:च्या आरोग्याबाबत फारशा गंभीर नसतात. घरातील प्रत्येक वस्तू प्रथम इतर सर्व सदस्यांना मिळाची आणि त्यानंतर ती स्वत:साठी घ्यावी, या वृत्तीमुळे त्या काही गोष्टींपासून वंचित राहतात. विशेषत: ग्रामीण भागातील महिलांमध्ये हे प्रमाण जास्त असते. तर शहरी भागातील महिला धावत्या जीवनशैलीसोबत स्वत:ला जुळवून घेण्याच्या स्पर्धेत आपल्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. इतरांना प्राधान्य देणे आणि स्वत: मात्र वंचित राहणे, या वृत्तीमुळेच हवामान बदलाचे वाईट परिणाम महिलांच्या आरोग्यावर जास्त होण्याची शक्‍यता संशोधनात वर्तविली गेली आहे.

या संशोधनात हवामान बदलामुळे होणारे परिणाम, त्यातून निर्माण होणारी संसाधनांची कमतरता, ही संसाधने आपल्याआधी आपल्या कुटुंबियांना मिळावी अशी महिलांमधेअ वृत्ती आणि त्यामुळे महिलांमध्ये निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या गंभीर समस्या याबाबत सविस्तर विश्‍लेषण करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button