हजारो पाकिस्तानी मुलींची वधुच्या रूपात चीनमध्ये तस्करी

पाकिस्तान आणि चीन यांच्या मैत्रीचे गोडवे आंतरराष्ट्रीय स्तरावर गायले जातात. मात्र एक या दोन देशांमधलं एक जळजळीत वास्तव समोर आलं आहे. हजारो पाकिस्तानी मुलींची वधुच्या रूपात चीनमध्ये तस्करी केली जाते आहे. मुकद्दस ही मुलगी फक्त १६ वर्षांची होती. त्याचवेळी तिचे लग्न चीनमधल्या एका तरूणाशी तिच्या आई वडिलांनी लावून दिले. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांमध्ये ही मुलगी माहेरी परतली. तेव्हा ती गरोदर होती आणि तिच्या नवऱ्यापासून तिला घटस्फोट हवा होता. नवरा आपल्याला शिवीगाळ करतो, अर्वाच्य भाषेत बोलतो अशी तक्रार तिने केली.
मुकद्दस या मुलीसारखी कहाणी शेकडो मुलींची आहे. त्यांना चीनमधल्या मुलांशी लग्न केल्यानंतर थोड्याफार फरकाने असाच काहीसा अनुभव आला आहे. या मुलींना वधू म्हणून तयार केले जाते आणि त्यानंतर त्यांची सोयीस्कर पद्धतीने फसवणूक केली जाते आणि त्यांना पाकिस्तानात पुन्हा धाडले जाते अशी माहिती या पीडित मुलींसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली. अशा मुली हेरणारे काही दलाल आणि त्यांचे रॅकेटच या व्यवसायात सक्रिय आहे असाही आरोप या कार्यकर्त्यांनी केला. मुलगा चांगला आहे, श्रीमंत आहे तुमच्या मुलीला सुखात ठेवेल असं आमिष दाखवलं जातं. त्यानंतर या मुलींची लग्न लावली जातात, नवऱ्याच्या घरी या मुलींना अक्षरशः गुलामासारखी वागणूक मिळते. त्यानंतर काही महिन्यात या मुली परततात.
मुलीचं लग्न लावून देणाऱ्या आई वडिलांना हजारो डॉलर्स मोबदला म्हणून दिले जातात. त्यांचा जावई श्रीमंत आहे असेही सांगितले जाते. प्रत्यक्षात मुलींना सहन करावी लागणारी परिस्थिती भयंकर असते. अनेक मुलींची लग्नं त्यांच्या इच्छेविरोधातही लावली जातात. यानंतर या मुलींना चीनमधल्या दुर्गम भागात असलेल्या खेडेगावांमध्ये नेले जाते. तिथे त्यांचा संपर्कही जगाशी तुटेल अशीही व्यवस्था केली जाते. त्यांचा शारिरीक मानसिक छळ केला जातो, तसंच त्या कुणाशी काहीही संपर्क करू शकणार नाहीत अशीही व्यवस्था केली जाते. अनेकदा मुली खूपच गरीब घरातल्या असतात त्यामुळे होणारा छळ सहन करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीही पर्याय उरत नाही. AP अर्थात असोसिएटेड प्रेसने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
काही काही प्रकरणांमध्ये मुलींचे काय हाल होत आहेत हे त्यांच्या आई वडिलांना समजते. त्यानंतर या मुलींना माहेरी बोलावले जाते. पण बहुतांश प्रकरणांमध्ये या मुली लैंगिक छळ, मानसिक छळाच्या दुष्टचक्रात अडकतात. यामध्ये ख्रिश्चन मुलींचं प्रमाण सर्वाधिक आहे. एका मुस्लिम मुलीचे प्रकरण उघडीला आल्यानंतर लग्नाच्या नावाखाली चीन आणि पाकिस्तानमध्ये चालणारे हे रॅकेट समोर आले आहे.