स्मार्ट सिटीत ‘ग्रीन’ उपक्रमांना प्राधान्य देणार – आयुक्त हर्डिकर

पिंपरी – शहरात दररोजचा निर्माण होणार्या कचर्याचे शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे. सांडपाण्याची प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर होत आहे. तसेच, दूषित हवा शुद्ध करणारे ‘एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टिम’ शहरभरात लावली जात आहेत. पवना व इंद्रायणी नदी सुधार योजनेची कार्यवाही सुरू आहे. नागरिकांच्या सोईसाठी 100 ‘ई-टॉयलेट’ बांधण्यात येत आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिली.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीत पर्यावरणपूरक उपक्रम आणि मोहिमेस अधिक महत्व आहे. तब्बल 23 लाखांच्या पुढे शहराची लोकसंख्या आहे. दररोज जमा होणार्या घनकचर्यांची मोशी कचरा डेपोत विविध पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. मेकॅनिकल कंपोस्टिंग प्रकल्पातून दररोज 400 ते 450 टन कंपोस्ट खत आणि गांडूळखत प्रकल्पात खत तयार होत आहे. प्लॅस्टिकपासून दररोज दीड टन इंधन निर्मिती होते. उर्वरित कचर्याचे 14 व 10 एकर जागेत सॅनिटरी लॅण्डफिल केले जात असल्याने परिसरात दुर्गंधी येत नसून, आगीचा घटनांना रोख लागला आहे.
सदर डेपोवर कचर्यापासून वीज निर्मिती प्रकल्प (वेस्ट टू एनर्जी) खासगी तत्वावर उभारला जात असून, त्याचे प्रत्यक्ष काम 3 महिन्यात सुरू होईल. त्यामुळे पालिकेस स्वस्त दरात दररोज 11.5 मेगा वॅट वीज उपलब्ध होणार आहे. हॉटेलमधून तयार होणारा ओला कचर्यापासून तळेगाव दाभाडे येथील खासगी प्रकल्पावर बायोगॅस निर्माण केला जाणार आहे. या कामास लवकरच सुरूवात होईल. बांधकामाचा राडारोड्यापासून प्रक्रिया करून त्याचा पुर्नवापराची यंत्रणा खासगी तत्वावर उभारली जात आहे. त्यामुळे नदीपात्रात राडारोडा टाकण्यास प्रतिबंध होणार आहे.
शहरात जमा होणार्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुर्नवापर उद्यान व बांधकाम क्षेत्रात केला जात आहे. असे प्रकल्प काही मोठ्या हाउसिंग सोसायट्यांनी स्वखर्चाने उभारले आहेत. वाहनांची संख्या वाढल्याने वायू प्रदूषणात भरच पडत आहे. हे रोखून शुद्ध हवा पुरविण्यासाठी वर्दळीच्या ठिकाणी 200 पैकी 35 ‘एअर पोल्युशन कंट्रोल सिस्टिम युनिट’ बसविण्यात आले आहेत.
एलईडी दिव्यांचा वापर करून वीज बचत केली जात आहे. सोलर पॅनेलचा वापर करून वीज निर्मितीचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे वीजेतून पालिकेची मोठी आर्थिक बचत होत आहे. पर्यावरणसंवर्धन व्हावे व त्याला चालना मिळावी म्हणून शहरातील हाउंसिग सोसायट्यांसाठी स्पर्धा घेण्यात येते.अनेक सोसायट्यांनी कंपोस्ट खत प्रकल्प विकसित केले आहेत. तसेच, दररोजचा ओला व सुका कचरा वेगवेगळा दिला जात आहे.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत हॉटेल, शाळा, मंडई अशा गटांसाठी स्पर्धा घेऊन स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सीएनजी रिक्षाचालक 12 हजार अनुदान दिले जात आहे. तसेच, शहरात सीएनजीचे पंपांची संख्या वाढविली आहे. नागरिकांना शौचालयाची चांगली सुविधा मिळावी म्हणून शहरभरात 100 ठिकाणी ‘ई-टॉयेलट’ उभारण्यात येणार आहेत. तसेच, वैयक्तिक घरगुती शौचालय उभारण्याचे टॉर्गेट पालिकेने पूर्ण केले आहे. सार्वजनिक ठिकाणी शौचालयाची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे उघड्यावर शौचाचे प्रमाण घटले आहे.