breaking-newsमनोरंजन

‘स्त्रियांची सुरक्षितता ही चित्रपट उद्योगाचीच जबाबदारी’

चित्रपटसृष्टीत कामाच्या निमित्ताने सातत्याने होणारा लैंगिक छळ, शोषण याबद्दल गेले काही दिवस अनेक अभिनेत्रींनी आपले अनुभव जाहीर केले असून आणखी असे प्रकार उघड होत आहेत. स्त्रीप्रधान चित्रपटांना महत्त्व देऊन गल्ला भरणारी चित्रपटसृष्टी आणि इथेच काम करणाऱ्या स्त्रियांचे शोषण करणारी चित्रपटसृष्टी असे परस्परविरोधी चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व घटनांमुळे चित्रपटसृष्टीत नव्याने पाऊ ल टाकणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण होणे साहजिक आहे. कामाच्या ठिकाणी स्त्रियांना सुरक्षित वातावरण देणे ही चित्रपटसृष्टीचीच जबाबदारी आहे. इथे काम करणाऱ्या स्त्रियांचा आदर केला पाहिजे, सत्तेचा किंवा अधिकाराचा गैरवापर होऊ नये, असे स्पष्ट मत अभिनेता सैफ अली खान याने व्यक्त केले.

सैफ अली खान सध्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिज आणि ‘बाजार’ चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आहे. दोन्ही ठिकाणी त्याच्या व्यक्तिरेखा त्याच्या आजवरच्या भूमिकांपैक्षा वेगळ्या आहेत. याविषयी विचारले असता तो म्हणाला, अभिनय करणं हा सर्जनशील अभिव्यक्तीचा भाग आहे. मला माझं हे काम खूप आवडतं. एखाद्या चांगल्या चित्रपटाचा भाग असणं, एखाद्या कथेतली व्यक्तिरेखा शून्यातून उभी करणं अशी संधी खूप कमी वेळा मिळते. ती भाग्याची गोष्ट असते. ‘बाजार’ चित्रपटात मी फक्त आणि फक्त पैशाच्या पाठी असलेल्या गुजराती व्यावसायिकाची भूमिका केली आहे. ही व्यक्तिरेखा पैशालाच देव मानणारी असून पैसा कमाविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणारी आहे. पैशानं सगळं काही विकत घेता येतं, अगदी आनंदही विकत घेता येतो, अशी या व्यक्तिरेखेची समजूत आहे. पण प्रत्यक्षात मी असा विचार करत नाही. माझ्या कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी, त्यांना चांगलं आयुष्य देता यावं यासाठी पैसा गरजेचा आहे असं मला वाटतं. मात्र त्यापलीकडे पैशाला महत्त्व देत नाही.

चित्रपटांची निवड करण्याविषयी त्याने सांगितले, गेल्या काही वर्षांत एकूणच अभिनयाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलत गेला आहे. मला पुस्तक वाचनाची खूप आवड असून अभिनयावरील पुस्तकं सातत्याने वाचत असतो. बऱ्याचदा माझी भूमिका ही अंत:प्रेरणेतूनच साकारतो. मात्र काही व्यक्तिरेखा अशा असतात की त्यावर विचार करावा लागतो. अशा वेळी अभिनयाची म्हणून जी गृहीतकं आहेत ती कामी येतात. त्यामुळे माझा अभिनय सुधारण्यासाठी मला मदतच होते. स्वत:चा कलाकार म्हणून असलेला अनुभव आणि अभिनयाची माझी समज या दोन्हीच्या मिश्रणातून ‘बाजार’मधील भूमिका साकारली आहे. अनुभवी  दिग्दर्शक आणि कलाकारांबरोबरचा सततचा संवाद, त्यांच्याबरोबर सातत्याने काम करणं यातून कलाकार म्हणून तुम्ही समृद्धच होत असता.

अभिनयाचे धडे मी आईकडूनच (शर्मिला टागोर) गिरवले आहेत. अभिनयाचे बारकावे शिकायला आणखी कुठे जावं लागलंच नाही. ते जे सहजपण आहे ते तिच्या शिकवणुकीतून मिळालं. जेव्हा तुम्हाला शंका असते तेव्हा ती भूमिका अगदी साधेपणाने करावी, असं महेश भट्ट यांनी शिकवलं तर एक अभिनेता म्हणून गोंधळला असशील तर शांत राहा, तुझ्या आजूबाजूला जे संगीत आहे त्यामुळे बाजू सावरली जाईल, असा सल्ला सूरज बडजात्या यांनी दिला. मात्र तुझ्याकडे आलेल्या व्यक्तिरेखेची ताकद काय आहे? ते आधी समजून घे. ती एकदा समजली की तुझ्या अभिनयाला धार चढेल हे पहिल्यांदा योग्य पद्धतीने मला दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवने याने शिकवलं आणि त्यामुळे आपल्याला योग्य सूर मिळाला. बदलत्या वयानुसार मी ज्या भूमिका साकारत आहे त्यातही बदल करायला पाहिजे, असं मला वाटतं. ‘तानाजी’ चित्रपटात एक वेगळी भूमिका साकारत असल्याचेही सैफ म्हणाला.

काम वगळता कुटुंब आणि मित्रपरिवार मला सगळ्यात महत्त्वाचा वाटतो. मला छोटय़ा छोटय़ा गोष्टी करायला आवडतात. संध्याकाळी चायनीज पदार्थाबरोबर एखादं सुंदर पुस्तक वाचायलाही आवडतं. चित्रीकरणाचं लांबलचक वेळापत्रक पार पडल्यानंतर मित्रांबरोबर किंवा घरच्यांबरोबर बाहेर जेवायला किं वा बाहेर फिरायला जाणंही पसंत करतो. कुटुंबाबरोबरचं हे घट्ट नातं, त्यांचा जिव्हाळा हा सगळा पैशात मोजता येणारा नाही.

दिग्दर्शक कोण आहे याने फारसा फरक पडत नाही. एक चांगला दिग्दर्शक आपल्या कलाकारांना योग्य पद्धतीने दिग्दर्शित करेल आणि त्याला जे हवं आहे ते तो या कलाकारांकडून बरोबर काढून घेईल. पण खरं सांगायचं तर तिथं अभिनय त्या कलाकारालाच करावा लागणार असतो. एखादी भूमिका कशी केली पाहिजे? कशा पद्धतीने अभिनय करायला हवा? हे दिग्दर्शक शिकवू शकणार नाही. तो त्या कलाकारालाच करावा लागतो.       -सैफ अली खान

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button