सोशल मीडियावर राजकीय पक्ष खोट्या बातम्या पसरवतात – ऑक्सफर्ड विद्यापीठ

लंडन (इंग्लंड) – सोशल मीडियावर राजकीय पक्ष आणि सरकारी एजन्सीज खोट्या बातम्या पसरवण्याचे काम करतात असे ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. खोट्या बातम्या पसरवणे, सेन्सॉरशिप करणे त्याचप्रमाणे मीडिया, सामाजिक संस्था आणि विज्ञान यांवरील विश्वास कमी करण्याचे काम राजकीय पक्ष सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असल्याचे ऑक्सफर्डच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यासाठी हे पक्ष लाखो ड़ॉलर्स खर्च करीत असतात.
कॉंप्युटर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा दुष्प्रचार रोखण्यासाठी प्रयत्न होत असले, तरीही सोशल मीडियाच्या माध्यमातून जनमत आपल्या बाजूने वळवण्यासाठी केले जाणारे भलेबुरे प्रयत्न हा जगभरात एक गंभीर धोका बनू पाहत असल्याचे आणि ही समस्या प्रचंड वेगाने वाढत असल्याचे ऑक्सफर्डच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
ज्या देशांत औपचारिक रीतीने आणि संघटितपणे सोशल मीडियात हेराफेरी केली जाते, अशा देशांची संख्या 28 वरून 48 पर्यंत वाढलेली आहे, असे स्पष्ट करून या अहवालाचे सहलेखक समंता ब्रॅडशॉ यांनी म्हटले आहे, की निवडणुकीच्या काळात खोटी माहिती पसरवणाऱ्या राजकीय पक्षांमुळे या दुष्प्रवृत्तीत वाढ होत असल्याचे दिसून आहे. ब्रेक्झीट आणि अमेरिकेच्या राष्टाध्यक्षांची निवडणूकीच्या वेळी झालेल्या रणनीतीतून बरेच काही शिकण्यासारखे आहे.