‘सोनू निगम, अलका याज्ञिकच्या आवाजाला श्रोते कंटाळले’ – भूषण कुमार

बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांना आपला सुमधूर आवाद देणारा गायक सोनू निगम आणि गायिका अलका याज्ञिक यांच्याविषयी निर्माता भूषण कुमार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे हे वक्तव्य करण्यापुर्वी भूषण कुमार यांनी समस्त गायकांची माफीही मागितली आहे.
भूषण कुमार हे बॉलिवूडमधील एक दिग्गज निर्माते असून त्यांनी ‘सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजाला श्रोते कंटाळले आहेत’ असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘एक काळ होता जेव्हा सोनू, अलका, उदित नारायण, हिमेश रेशमिया आणि अदनान सामी याची गाणी प्रचंड लोकप्रिय होती. त्यांनी श्रोत्यांच्या मनावर राज्य केलं होतं. मात्र आता काळ बदलला आहे. त्यामुळे आताची पिढी नव्या गायकांच्या आवाजाला पसंती देत आहे. पाच वर्षापूर्वीची गाणी ऐकायला आजची पिढी जास्त वाव देत नाही. याच कारणामुळे आता ही पिढी सोनू, अलका यांच्या आवाजाला कंटाळली आहे’, असं भूषण कुमार यांनी म्हटंल.
पुढे ते असंही म्हणाले, ‘हे सारे चांगले गायक आहेत. त्यांच्याबरोबर माझं कोणतंच वैर नाही. मी स्वत: त्यांच्याबरोबर काम केलं आहे. त्यांच्या कामाविषयी कोणत्या अटीही नसतात. मात्र आता काळ बदलल्यामुळे लोकांच्या आवडीनिवडीही बदलल्या आहेत. त्यामुळे मी श्रोत्यांच्या, चाहत्यांच्या आवडीनुसार गाणी तयार करण्याचा प्रयत्न करत असतो’. दरम्यान, भूषण यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या गायकांची भूषण यांनी माफी मागितली असून जे सत्य आहे तेच मी सांगत आहे असं स्पष्टीकरणही दिलं.