सुशासित राज्यांमध्ये केरळ तिसऱ्या वर्षी अव्वल – बिहार शेवटच्या क्रमांकावर

बेंगळूर (कर्नाटक) – देशातील सर्वात उत्तम प्रशासन असलेल्या देशांच्या यादीत केरळने सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे. तर बिहार शेवटच्या क्रमांकावर आहे. सुशासनबाबत राज्यांची क्रमवारी ठरवण्याचे काम थिंक टॅंक पीएसी (पब्लिक अफेयर्स सेंटर) करते. या यादीत तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक आणि गुजरात अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. पीएसी इंडेक्स 2018 या नावाने प्रसिद्ध केलेल्या यादीत मध्य प्रदेश, झारखंड, आणि बिहार ही राज्य शेवटून तिसऱ्या, दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकवर आहेत.
पीएसीचे अध्यक्ष कस्तुरीरंगन यांनी सांगितले आहे, की पीएसी राज्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करते आणि त्यांना गुंण देऊन त्यांची क्रमवारी लावते. ही क्रमवारी लावत असताना राज्यांतील पायाभूत सुविधा, मानव विकास, सामाजिक सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, महिलांची आणि बालकांची स्थिती, आदी गोष्टी विचारात घेतल्या जातात.
छोट्या राज्यांमध्ये सुशासनाबाबत हिमाचल प्रदेशाने बाजी मारली आहे. या वर्गात गोवा दुसऱ्या, मिझोरम तिसऱ्या,सिक्कीम चौथ्या आणि त्रिपुरा पाचव्या क्रमांकावर आहेत. तर नागालॅंड, मेघालय शेवटच्या क्रमांकांवर आहेत.