सुनिधी चौहानने शेअर केला मुलाचा फोटो

गायिका सुनिधी चौहानने १ जानेवारीला मुलाला जन्म दिला. पण त्यानंतर मात्र तिने मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर होऊ दिला नव्हता. पण रविवारी सुनिधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मुलाचा पहिला फोटो शेअर केला. फोटोमध्ये तिने मुलाला एका हातात उचलून धरले आहे. गरोदरपणात सुनिधी सोशल मीडियावर फार सक्रीय होती. त्यावेळी तिने अॅमेझॉन प्राइम रिअॅलिटी शोचे परीक्षण केले होते. हा शो फार हिट झाला होता.
एका मुलाखतीत आई झाल्याच्या अनुभवाबद्दल बोलताना सुनिधी म्हणाली की, ‘तुमच्या शुभेच्छाची मी आभारी आहे. मी फार उत्साहित आहे. हे अनमोल क्षण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा अनुभवत आहे. ही जगातील सगळ्यात जादुई गोष्ट आहे.’
सुनिधीने तिच्या करिअरची सुरूवात ती चार वर्षांची असताना केली होती. लहानपणी तिने अनेक गाण्यांच्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. पण तिच्यातल्या गुणांची पारख टीव्ही अँकर तब्बसूम यांना झाली. तब्बसूम यांनी सुनिधीच्या पालकांना मुंबई गाठण्याचा सल्ला दिला. तब्बसूम यांच्या सांगण्यावरून सुनिधीचे आई- बाबा तिला घेऊन मुंबईत आले.
यानंतर सुनिधीने दूरदर्शनवरील मेरी आवाज सुनो या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आणि या शोची विजेतीही ठरली. सुनिधीने आतापर्यंत अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे. यातील ‘शीला की जवानी’, ‘इश्क सूफियाना’, ‘बीडी जलाइ ले’, ‘देसी गर्ल’, ‘कमली’, ‘भागे रे मन’ या गाण्यांचा समावेश आहे.