सीरियावर रशियाने केलेल्या हल्ल्यांची चौकशी करा

- संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांची सूचना
संयुक्तराष्ट्रे – सीरियात अलिकडेच झालेल्या हवाई हल्ल्यात अनेक लहान बालके ठार झाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे. हा हल्ला रशियाने केल्याचे सांगितले जात आहे. 7 आणि 8 जूनच्या रात्री हे हल्ले केले गेले. त्यात नागरी वस्त्यांमधील अनेक जण ठार झाले असून त्यात लहान मुलांचाही समावेश आहे. एका ब्रिटीश मानवाधिकार समितीने मिळवलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात एकूण 44 जण ठार झाले असून त्यात किमान सहा बालके आहेत.
या घटनेबद्दल संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या प्रकाराची सविस्तर चौकशी झाली पाहिजे अशी सूचना त्यांनी एका निवेदनात केली आहे. सीरियात हल्ले न करण्याबाबत तुर्की, रशिया, आणि इराण यांनी करार केला आहे. हे करार करणाऱ्यांनी आपली जबाबदारी पाळली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. सीरियाच्या इडलिब प्रांतात हे हवाई हल्ले झाले. तेथे बऱ्याच भागात इस्लामिक स्टेटच्या गनिमांचे प्राबल्य असून काही भाग रशियाचा पाठिंबा असलेल्या सरकारी फौजांच्या ताब्यात आहे.
सीरियात सन 2011 साली सुरू झालेल्या यादवीत अणि त्यानंतर विविध देशांनी तेथे केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये आत्तापर्यंत एकूण साडे तीन लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.