सीबीआयने नोंदवला राबडीदेवींचा जबाब

पाटणा – सीबीआयने आज बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा मनी लॉण्डरिंग प्रकरणी जबाब नोंदवून घेतला. नोटाबंदीनंतर एका सहकारी बॅंकेत मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करण्यात आली. त्या प्रकरणात काळा पैसा पांढरा करण्यात आल्याचा संशय आहे. याप्रकरणी सीबीआयने काही दिवसांपूर्वी राबडींना नोटीस बजावली होती. त्यानंतर सीबीआयचे चार सदस्यीय पथक आज राबडींचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहचले.
यावेळी राबडी यांचे पती आणि राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव हेही उपस्थित होते. चारा घोटाळ्यात शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर जामीन मिळाल्याने लालू सध्या तुरूंगाबाहेर आहेत. दरम्यान, राबडींनी सीबीआयच्या पथकाला प्राप्तिकर विवरणपत्रे आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे दाखवली. समाधान झाल्याने सीबीआयचे पथक लालूंच्या कुटूंबातील इतर कुठल्या सदस्याशी न बोलता बाहेर पडले, अशी माहिती सुत्रांनी दिली.