breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सावकारकीच्या व्याजापोटी विवाहितेवर अत्याचार, तिघा सावकारांवर गुन्हा

कोल्हापूर – पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या व्याजापोटी अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या नवविवाहितेवर गेल्या चार महिन्यांपासून अत्याचार केल्याप्रकरणी तिघा सावकारांवर शुक्रवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित सदाम मुल्ला (यादवनगर, कोल्हापूर), हरीश स्वामी (रुईकर कॉलनी, कोल्हापूर), आशिष पाटील (रा. सायबर चौक, राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत.

पीडित विवाहितेसह तिच्या पतीने संबंधित तिघा सावकारांविरोधात तक्रार देऊनही जुना राजवाडा पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. दाम्पत्याने ‘अंनिस’च्या सामाजिक कार्यकर्त्या सीमा पाटील, गीता हसूरकर, मंगल पवार यांची भेट घेतली. त्यांनी दाम्पत्यासह पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर डॉ. देशमुख यांनी शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. कट्टे यांनी पोलीस मुख्यालयातच पीडितेची फिर्याद घेतली. रात्री उशिरा संशयितांची धरपकड सुरू होती.

पोलिसांनी सांगितले, कळंबा परिसरात राहणाऱ्या अठरा वर्षांच्या युवतीची पुण्यातील युवकाशी नोकरीच्या ठिकाणी ओळख झाली. या दोघांनी सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला. युवक पुण्याचा असल्याने त्याला कोल्हापुरात स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा होता. त्याने रुईकर कॉलनीत राहणारा मित्र हरीश स्वामी याच्या मदतीने सदाम मुल्ला व आशिष पाटील यांच्याकडून ३० हजार रुपये व्याजाने घेतले. त्यांनी दिवसाला तीन हजार रुपये व्याज द्यावे लागेल या अटीवर पैसे दिले. विवाहित युवकाने तीन दिवसांचे १० हजार ५०० रुपये व्याज दिले. चौथ्या दिवसापासून त्याने व्याज दिले नाही. संशयित मुल्ला याने व्याजाच्या पैशासाठी तगादा लावून विवाहितेला व्हॉट्स अ‍ॅप मेसेज, कॉल करून हैराण करून सोडले.

व्याजाच्या पैशाच्या बदली त्याने तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर मुल्ला याने तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत आपल्या आणखी दोन मित्रांशी संबंध ठेवण्यासाठी तगादा लावला. त्यास तिने नकार दिल्याने तिला अश्लील शिवीगाळ करणे, रात्री-अपरात्री तिच्या पतीला उचलून नेत मारहाण करणे असे प्रकार तो करू लागला. हा त्रास असह्य झाल्याने विवाहितेने ‘अंनिस’ या सामाजिक संस्थेकडे धाव घेतली. येथील सामाजिक महिला कार्यकर्त्यांनी तिला धीर देत पोलीस अधीक्षकांकडे नेले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत डॉ. देशमुख यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button