breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“सामना”च्या विरोधातील तक्रारीने राष्ट्रवादीच्या कथीत निष्ठावंतांना “धक्का”

  • विद्यमान पदाधिका-यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
  • संदीप पवार यांनी घेतला शिवसेनेशी खुला पंगा

अमोल शित्रे

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – राष्ट्रवादीचे कारभारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर छापून बदनामी केल्याने पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते “सामना”च्या विरोधात आक्रमक झाले आहेत. शिवसेना आणि “सामना”तील तो बदनामीकारक अग्रलेख बाजुला सोडला, तर या विषयी झालेल्या आंदोलनातील उपस्थितीवरून राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसते. दोन माजी आमदार, विरोधी पक्षनेते, शहराध्यक्ष, महिला अध्यक्षा, युवक अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष अशी तगडी फळी असताना “सामना”च्या विरोधात पक्षाचे कार्यकर्ते संदीप पवार यांनी पोलिसांत तक्रार केल्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे. मात्र, चिंचवड विधानसभेसाठी उठबशा काढणा-या पक्षाच्या कथीत निष्ठावंतांनी मात्र पवार यांच्या भूमिकेचा चांगलाच धसका घेतला आहे.

शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे रखडलेले स्मारक आणि राम मंदिर बांधण्यासाठी अयोध्येला जाण्याचे उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विधानावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टिका केली होती. त्या टिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शनिवारच्या (दि. 27) “सामना” या शिवसेनेच्या मुखपत्रात अग्रलेखातून अजित पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत वर्णन केले. त्यामुळे राज्यभरातील राष्ट्रवादीत संताप उसळला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात “सामना”ची होळी करण्यात आली. मात्र, आपल्या नेत्याविषयी आक्षेपार्ह मजकूर छापल्याचा संताप व्यक्त करण्यासाठी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्तेच समोर आले. ज्यांना अजित दादांनी मोठ-मोठी पदे दिली, अनेकदा आमदार केले, खासदारकिची तिकीटे दिली. काहींना महापौर केले, स्थायीच्या तिजो-या विश्वासाने हाती सोपविली. तर, वारसाहक्काने पक्षाचे कार्य करत आल्याची मेहेरबानी दाखविणा-यांना दादांनी महत्वाची पदे दिली. मात्र, त्यातील अनेकांनी होळी आंदोलनात गैरहजेरी लावल्याने त्यांच्या मनातील दादा आणि राष्ट्रवादी विषयीची निष्ठा कळून चुकली आहे.

आंदोलनानंतर पुढे काय, असा प्रश्न उपस्थित झाल्याने पक्षाचे कार्यकर्ते संदीप पवार यांनी वाकड पोलीस ठाण्यात सामनाच्या विरोधात तक्रार दिली आहे. मराठा मुक मोर्चाविषयीचे “सामना”तील आक्षेपार्ह कार्टून ते कालचा अजित पवार यांच्याविषयी अग्रलेखातील अश्लिल भाषेचा शब्दप्रयोग, याचा संदीप पवार यांनी समाचार घेतला आहे. अग्रलेखात वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेसंदर्भात संपादकानी “सामना”तून माफी मागावी, अन्यथा शिवसेनेच्या मंत्र्यांना शहरातून फिरू देणार नाही, असा इशारा पवार यांनी दिला आहे. त्यामुळे पक्षात स्वतःला निष्ठावंत समजणारे पदाधिकारी व 38 नगरसेवक आणि नवीन कार्यकर्ते, अशा तीन गटात राष्ट्रवादी विभागलेली दिसत आहे. त्यातच संदीप पवार यांनी पुढे येऊन ही तक्रार दिल्याने शहरात केवळ त्यांच्याच नावाचा बोलबाला सुरू आहे. संदीप पवार हे पुनावळे-ताथवडे (प्रभाग 25) येथील कार्यकर्ते आहेत. या प्रभागात राहूल कलाटे, रेखा दर्शिले आणि अश्विनी वाघमारे हे तीन शिवसेनेचे नगरसेवक आहेत. सेनेचे वर्चस्व असताना सुध्दा पवार यांनी हे धाडसी पाऊल उचलल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदार संघातून पवार शड्डू ठोकणार आहेत का, असा प्रश्न निर्माण झाल्याने त्याची राष्ट्रवादीच्या कथीत निष्ठावंतांनी धासती घेतली आहे.

“सामना”तील अग्रलेखात वापरलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे आमचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची बदनामी झाली आहे. “सामना”चे संपादक यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करणार आहे. पुन्हा असे वक्तव्य केल्यास शिवसेनेच्या मंत्र्यांना आणि “सामना”च्या संपादकांना शहरात फिरू देणार नाही.

संदीप पवार, युवा कार्यकर्ते, राष्ट्रवादी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button