breaking-newsमुंबई

‘सामना’च्या आगीशी खेळू नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

‘सामना’ हा जनतेचा लाऊडस्पीकर आणि खोटारड्यांचा आरसा आहे त्याच्या आगीशी खेळू नका. मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले आहे सामनाच्या आगीने जळून खाक होईल असे म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका चॅनलच्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी प्रतिक्रिया देताना सामना सरकार चालवत नाही मी चालवतो असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला शिवसेनेने पुन्हा एकदा सामनातूनच प्रत्युत्तर दिले आहे. एवढंच नाही तर मुख्यमंत्र्यांचे कान टोचण्याचाही प्रयत्न या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?

महाराष्ट्राचे चकचकीत आणि टकटकीत मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचा महिमा काय वर्णावा? तो अद्भुतच आहे. त्यांच्या कारकीर्दीस चार वर्षे झाली. त्यामुळे प्रथा-परंपरेनुसार त्यांनी मुलाखती वगैरे देऊन आपले मन मोकळे केले आहे. दिवाळीच्या आधीच मुख्यमंत्र्यांनी काही आपटी बार फोडले आहेत. चार वर्षांत जनतेने बरेच काही सोसले व भोगले असले तरी मुख्यमंत्र्यांचा काळ तसा सुखाचा गेला. फार संघर्ष, कष्टाचे जीवन त्यांच्या नशिबी आले असे झाले नाही. त्यांचे हेलिकॉप्टर अनेकदा भरकटले, पण शेवटी त्या बेधुंद वादळातही त्या उडनखटोल्याची चाके जमिनीस लागली हे त्यांचे आणि महाराष्ट्राचे भाग्यच म्हणावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, चार वर्षांत महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर नेले. पहिला क्रमांक त्यांनी नेमका कोणत्या विषयात मिळवला? महागाई, बेरोजगारी, ढिसाळ कारभार की आणखी कशात? चार वर्षे होत असताना शिवस्मारकाच्या पायाभरणीस निघालेली बोट बुडाली. हा काही शुभ संकेत नाही.

‘सामना’च्या आगीशी खेळू नका. मोदींच्या भाग्याने प्राप्त झाले ते ‘सामना’च्या आगीने जळून खाक होईल. मुख्यमंत्र्यांना सकाळी उठून ‘सामना’ वाचावाच लागतो. सत्याचे कडू घोट पचवायला हिंमत लागते. ‘सामना’ हा जनतेचा लाऊडस्पीकर आणि खोटारडय़ांचा आरसा आहे. मुख्यमंत्र्यांनी चौथ्या वर्षी मैत्रीचा, युतीचा सूर लावला आहे. फडणवीस म्हणतात, काही झाले तरी युती होईल. जागा वाटपावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. फडणवीस यांनी असेही सांगितले की, हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊ नये म्हणून युती अतिशय आवश्यक आहे. शाब्बास! शाब्बास देवेंद्रजी! अब आया उंट पहाड के निचे, असे आम्ही मानावे काय?

शिवसेना पक्षाच्या चाव्या नरीमन पॉइंटच्या भाजप कार्यालयात नसून लाखो कडवट शिवसैनिकांच्या हाती आहेत. आम्ही त्यांचे नेतृत्व करीत आहोत. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ‘स्वबळा’वर लढून महाराष्ट्राची सत्ता मिळवण्याचा एक ठराव एकमताने मंजूर झाला. शिवसेनेचा ठराव म्हणजे बेडकी डराव नाही. मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे यांना आता चौथ्या वर्षी जो शिवसेनाप्रेमाचा पान्हा फुटला आहे तो काही उगाच नाही. कारण इतरांच्या बाबतीत सोळावं वरीस धोक्याचं असेल, पण फडणवीस व त्यांच्या सरकारसाठी पाचवं वरीस धोक्याचं ठरेल असा माहौल स्पष्ट दिसत आहे. इतरांच्या खुर्च्यांना टेकू देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला नाही. देवेंद्रजी, शिवसेनेच्या राजी-नाराजीची चिंता तुम्ही करू नका. महाराष्ट्राची जनता नाराज आहे. त्याची चिंता करा. बाकी ‘सामना’ आहेच. वाचत रहा. ‘सामना’ वाचतो हे लपवत रहा. हेच ‘सामना’चे यश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button