साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारी विरोधात याचिका

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला भाजपाकडून भोपाळमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मालेगाव बॉम्ब स्फोटातील पीडिताच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याने साध्वी प्रज्ञाच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
नासिर बिलाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. एनआयए कोर्टाकडून जामीन मिळवताना साध्वी प्रज्ञा यांनी खराब प्रकृतीचे कारण दिले होते. साध्वी यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने भोपाळमधून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना उमेदवारी दिली आहे. साध्वी प्रज्ञा यांच्याकडे कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पाहिले जाते.
साध्वी प्रज्ञा यांनी मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार असे सांगितले आहे. साध्वी प्रज्ञा बुधवारी सकाळी भोपाळमधील भाजपा कार्यालयात आल्या होत्या. तिथे भाजपाचे नेते शिवराज सिंह चौहान, राम लाल आणि प्रभात झा यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
भोपाळच्या जागेसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. भोपाळ मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आलोक सांजर यांना ७.१४ लाख मते मिळाली होती. मालेगावमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी एका मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा आरोपी आहेत.