सात राज्यांमध्ये हवा हिंदुंना अल्पसंख्य दर्जा

- अल्पसंख्य आयोगात 14 जूनला होणार सुनावणी
नवी दिल्ली – देशातील सात राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये आम्हालाही अल्पसंख्याकांचा दर्जा मिळावा अशी मागणी तेथील हिंदुंकडून करण्यात आली असून त्याविषयी शिफारस करण्यासाठी अल्पसंख्याक आयोगाने एक उपसमिती गठित केली आहे. या समितीने 14 जुनला या विषयी सुनावणी घेण्याचे योजले असून त्यासाठी सर्व संबंधीतांना आपले म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले की सध्या ही समिती या विषयाचा अभ्यास करीत आहे. सर्व संबंधीतांशी बोलूनच यावर निर्णय घेतला जाणार आहे. जॉर्ज कुरियन हे या समितीचे अध्यक्ष आहेत. भाजपचे नेते अश्विनी उपाध्याय यांनी सात राज्यांमध्ये हिंदु लोकसंख्येच्या तुलनेत अल्पसंख्य असून तेथे त्यांना अल्पसंख्याक दर्जा द्यावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली आहे.
मेघालय, मिजोराम, पंजाब, काश्मीर, मणिपुर, नागालॅंड, आणि लक्ष्यद्वीप या केंद्र शासित प्रदेशात हिंदु अल्पसंख्य आहेत असे त्यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने उपाध्याय यांना या संबंधात राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाकडे जाण्याची सुचना केली आहे त्यानुसार त्यांनी तेथे दाद मागितल्यानंतर त्यांच्या अर्जावर विचार करण्यासाठी आयोगाने ही उपसमिती नेमली आहे.