सातारा, सांगली, कोल्हापूरवासीयांचीही आता पार्थ पवार यांना साथ?; खासदार बारणे यांना धक्का!

– छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सभेनंतर शहरातील ‘वातावरणात बदल’
– पिंपरी-चिंचवडमधील स्थानिक-बाहेरचा मुद्दा शिवसेना-भाजपच्या अंगलट
पिंपरी। पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात ‘स्थानिक आणि बाहेर’चा हा वाद जोर धरु लागला आहे. शिवसेना उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या समर्थकांनी स्थानिक उमेदवार म्हणून ‘आप्पांना मते द्या…’ असा प्रचार सुरू केला. त्यामुळे अगोदरच नाराज झालेल्या ‘बाहेर’च्या मतदारांना छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या झंझावाती सभेमुळे उर्जा मिळाली आहे. बाहेरगावच्या मतदारांनी आता राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार असलेल्या पार्थ पवार यांना साथ देण्याचा निर्धार केला आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीच्या वतीने रविवारी चिंचवडमधील नियोजित महापौर निवासस्थानाच्या जागेवर प्रचार सभा झाली. मावळचे उमेदवार पार्थ पवार आणि शिरुरचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. मात्र, सभेला सातारचे खासदार आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांची उपस्थिती शहरात चर्चेचा विषय ठरली. अत्यंत ‘डॅशिंग’ शैलीत बोलणारे उदयनराजे चिंचवडमधील सभेत कोणता हल्लाबोल करणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. सभेची जोरदार तयारी झाली करण्यात आली होती. सभास्थही सुमारे आठ हजार श्रोते जमले होते. मात्र, अवकाळी पावसाने धुडगूस घातला. संपूर्ण मैदान रिकामे झाले. पाउस थांबल्यानंतर पुन्हा नागरिक येवू लागले. खासदार उदयनराजे येणार हे निश्चित झाल्यानंतर पुन्हा मैदानावर गर्दी झाली.
अपेक्षेप्रमाणे खासदार उदयनराजे यांनी आपल्या खास शैलीत भाजप-शिवसेनेच्या धोरणांचा समाचार घेतला. त्याबरोबरच पहिल्या भाषणावरुन ‘ट्रोल’ झालेल्या पार्थ पवार यांना सांभाळून घेण्याऐवजी खिल्ली काय उडवता? असा दमही विरोधकांना भरला. सभा झाली, पण उदयनराजे यांच्या सभेनंतर हवामानातील बदलाप्रमाणे शहरातील राजकीय वातावरणातही बदल झालेला दिसत आहे. खासदार उदयनराजे यांना मानणारा मतदार पार्थ पवार यांच्या मदतीला धावणार आहे, अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये पहायला मिळत आहे.