सांगोल्यातील एका तरुणांचा उष्माघाताने घेतला बळी?

सांगोला – सांगोला तालुक्यातील कडलास येथील सूर्यकांत ज्योतीराम काशीद (वय 35) हे अचानक चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 3) सकाळी 9 च्या सुमारास घडली.
सूर्यकांत काशीद हे उन्हातून घरी आले. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले व चक्कर आल्याने ते खाली कोसळले. त्यामुळे त्यांचा मृत्यू उष्माघातामुळे तर झाला नाही ना? की अन्य कारणामुळे याची चर्चा होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सूर्यकांत काशीद हे वाढत्या उन्हामुळे अस्वस्थ वाटत असल्याच्या कारणावरून घराबाहेर पडणे टाळत होते. दोन दिवसांपासून ते घरच्यांकडे वारंवार पिण्यासाठी पाण्याची मागणी करत होते. काल बुधवारी ते आपल्या कडलास येथील शेतातून घरी परतत असताना चक्कर आल्याने कोसळले. नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.
मृत सूर्यकांत काशीद सांगोला शहरातील केश कर्तनालयात रोजंदारीवर काम करायचा. गेल्या दोन दिवसांपासून वाढत्या उन्हाचा त्रास होत असल्याने तो कामावर गेला नव्हता. त्याचबरोबर घराबाहेर पडणेही टाळून तो दोन दिवसांपासून घरातच होता. याबाबत सागर नारायण काशीद यांनी सांगोला पोलिसांना खबर दिली आहे. ग्रामीण रुग्णालयात सूर्यकांत काशीद यांचे शव-विच्छेदन करण्यात आले. मृताचा अहवाल तहसीलदार यांना पाठविण्यात आला आहे. सांगोला पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद दाखल केली आहे.