सर्व विरोधी नगरसेवकांच्या सांगण्यावर महासभा पुढे ढकलली

पिंपरी – महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे अमेरिकेला गेले आहेत. ते साधारणपणे 4 जूनला शहरात परतणार आहेत. त्यामुळे महापालिका सभेत विरोधकांच्या विविध प्रश्नांना खुलासा करण्यास अन्य अधिका-यांना जमणार नाही. तसेच पे अन्ड पार्किंग पाॅलिसी धोरणावर विरोधक गोंधळ घालतील, त्या अगोदरच सत्ताधारी भाजपने विविध क्षेत्रात निधन झालेल्या मान्यवरांना श्रध्दाजंली अर्पण करुन मे महिन्याची महासभा 11 जून पर्यंत तहकुब करण्यात आली. परंतू, ही सभा जूनच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार होती. परंतू, अनेक विरोधी नगरसेवकांच्या सांगण्यावरुन 11 जून पर्यत पुढे ढकलण्यात आली आहे, असे एका पदाधिका-यांने सांगितले.
महापालिका सभागृहात महासभेच्या अध्यक्षस्थानी महापैार नितीन काळजे होते. या सभेत पीसीएमटीचे माजी अध्यक्ष सुरेश चोंधे, दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर, ज्येष्ठ गायक अरुण दाते, आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय, भिगवण येथील अपघात मृत्यू झालेल्या निगडी येथील गायकवाड कुटुंबातील पाच सदस्यांना, उत्तरप्रदेशमधील वादळात मृत्यू झालेल्यांना सभेत श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी नगरसेवक विलास मडेगिरी यांनी श्रध्दांजली वाहून सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्याला सागर आंगोळकर यांनी अनुमोदन दिले.
दरम्यान, महापालिकेच्या सभेत शिक्षण समितीची स्थापन करून नऊ नगरसेवकांची निवड, ‘पार्किंग’ पॉलिसीच्या धोरणाला मंजुरी, बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा देण्यास संरक्षण खात्याने सहमती दर्शिवली आहे. त्या जागेची किंमत म्हणून पालिका संरक्षण विभागाला 25 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव महासभेसमोर होता. मात्र सभा तहकूब केल्याने 11 जूनपर्यंत हे प्रस्ताव पुढे लांबणीवर पडले आहेत.