सर्व रोहिंग्यांना मायदेशी परत घेण्याची म्यानमारची तयारी

सिंगापूर – म्यानमारमधून बांगलादेशात पळून गेलेल्या सर्व 7 लाख रोहिंग्या मुस्लिमांना परत मायदेशात घेण्याची तयारी म्यानमारने दर्शवली आहे. हे सर्व रोहिंग्या मुसलमान जर स्वतःहून म्यानमारमध्ये येऊन राहण्यास तयार असतील, तर त्यांना परत घेतले जाईल असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार थुआंग तुन यांनी म्हटले आहे. सिंगापूरमधील प्रादेशिक सुरक्षा सल्लागारांच्या “शांग्री ला’ परिषदेमध्ये ते बोलत होते.
म्यानमारमधील रखाईन प्रांतातल्या परिस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही तयारी दर्शवली. रखाईन प्रांतात बहुतेक रोहिंग्या मुस्लिमांची वस्ती आहे. संयुक्त राष्ट्राच्या चौकटीमध्ये “रिस्पॉन्सिबिलीटी टू प्रोटेक्ट’ अंतर्गत या रोहिंग्यांबाबत त्यांना विचारण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्राचा “रिस्पॉन्सिबिलीटी टू प्रोटेक्ट’ 2005 मध्ये अस्तित्वात आला. या अंतर्गत सदस्य देशांनी आपल्या लोकसख्येच ज्ञाती हत्या, युद्धगुन्हे, वांशिक हत्याकांड आणि मानवताविरोधी गुन्ह्यांपापासून संरक्षण करण्याचे मान्य केले आहे.
जर 7 लाख रोहिंग्यांना परत पाठवले गेले, तर आम्ही त्यांना स्वीकारण्यास तयार आहोत. तर मग याबाबत वांशिक हत्याकांड म्हणता येईल का ? असे तुन म्हणाले.
म्यानमारमधून सुमारे 7 लाख रोहिंग्यांनी बांगलादेशामध्ये पळ काढला आहे. हे वांशिक हत्याकांडाचे उदाहरण आहे, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले होते. मात्र म्यानमारने हा आरोप फेटाळला होता. पळून गेलेल्या सर्वा रोहिंग्यांना दोन वर्षात परत म्यानमारमध्ये आणण्याच्या आराखड्याला म्यानमार आणि बांगलादेशात समझोता झाला होता. या संदर्भात म्यानमारने संयुक्त राष्ट्राशीही एक करार केला आहे.