Mahaenews

“सब का साथ, सब का विकास’वर सोनिया गांधींचे प्रश्‍नचिन्ह

Share On

कर्नाटककडे मोदींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप 

विजयपुरा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सब का साथ, सब का विकास’ या लोकप्रिय घोषणेवर “युपीए’ अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. मोदी सरकारने कॉंग्रेसशासित कर्नाटककडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही सोनिया गांधी यांनी केला. कर्नाटकातील विधानसभा निवडणूक प्रचारसभेमध्ये त्या बोलत होत्या. तब्बल दोन वर्षांनंतर सोनिया गांधी यांनी निवडणूक प्रचारामध्ये भाग घेतला आहे.

पंतप्रधान मोदींनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या आरोपांना उत्तर देताना सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांवर जोरदार टीकास्त्र सोडले. प्रस्तावित लोकपाल कायद्याचे काय झाले, मोदी सरकार कर्नाटक सरकारबाबत भेदभाव करत आहे. असा भेदभाव करणे म्हणजेच “सब का साथ, सब का विकास’ आहे का ? असा जळजळीत प्रश्‍नही सोनिया गांधींनी विचारला.

मोदी चांगले वक्‍ते आहेत. एखाद्या कसलेल्या कलाकाराप्रमाणे ते बोलत असतात. मात्र त्यांच्या भाषणामुळे लोकांचे पोट भरत नाही, अशा शब्दात सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींच्या भाषणांवर टीका केली.

बहुप्रतिक्षित लोकपाल कायद्याला राष्ट्रपतींनी जानेवारी 2014 मध्येच मंजूरी दिली आहे. आता या कायद्यानुसार लोकपाल अस्तित्वात येणे फक्‍त बाकी राहिले आहे. पंतप्रधानांनाही कायद्याच्या कक्षेमध्ये आणणाऱ्या या लोकपालची अद्याप नियुक्‍ती झालेली नाही.

Exit mobile version