breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सत्ताधारी भाजपमध्ये सुडाचे राजकारण?

  • ‘त्या’ राजीनामा नाट्यामुळे महापौरांना कार्यक्रमात डावलले
  • महापौर नितीन काळजे यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या सभापतीपदावरून मध्यंतरी राजीनामानाट्य रंगल्याने सत्ताधारी भाजपमध्ये नव्यांमधील दोन गटांमध्ये एकमेकांचे उट्टे काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी कथित निष्ठावंतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाना साधला जात आहे. राजीनामा नाट्याचा वचपा काढण्यासाठी विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमात शहराचे प्रथम नागरिक महापौर नितीन काळजे यांना चक्क डावलण्यात आले. त्यातच दोन दिवसांपूर्वी महापौरांच्या विरोधात त्यांच्याच प्रभागात राहणा-या भाजपच्या शैला मोळक यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. यावरून राजीनामा नाट्याचा बदला घेण्यासाठी पक्षांतर्गत सुडाचे राजकारण केले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक नाडी असलेल्या स्थायी समितीची सूत्रे आपल्या हाती ठेवण्यासाठी शहरातील मातब्बर नेत्यांचा महापालिकेच्या राजकारणात हस्तक्षेप होतो. या नेत्यांनी शहराचे तुकडे पाडून आपापल्या भागावर निर्विवाद वर्चस्व सिध्द केल्याने त्यांच्याकडून पालिकेतील अर्ध्या सत्तेवर दावा दाखवला जातो. आपापसातील नाराजी दूर ठेवण्यासाठी महत्वाच्या पदावर काहीकाळासाठी सर्वांना संधी दिली जाते. भाजपच्या सत्तेतील पहिल्या स्थायी समितीचे सभापतीपद शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्या गटाला मिळाले. त्यामुळे दुस-या वर्षात या पदावर आमदार महेश लांडगे यांनी दावा केला होता. मात्र, ऐनवेळी जगताप यांनी खेळी करत आपल्याच गटातील मागासवर्गीय चेहरा असलेल्या ममता गायकवाड यांना सभापती पदावर बसवले. त्यामुळे लांडगे गटातील महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सदस्य राहूल जाधव, क्रीडा समिती सभापती लक्ष्मण सस्ते, शहर सुधारणा समिती सभापती सागर गवळी यांनी तातडीने पदाचे राजीनामे दिले. या राजीनामा नाट्यावरून जगताप यांनी लांडगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी लांडगे यांनी सबुरीची भूमिका घेतल्याने राजीनामानाट्यावर पडदा पडला. परंतु, त्याचा वचपा काढण्यासाठी सांगवीचा गट सक्रिय झाला आहे, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.
आमदार लांडगे गटाच्या भूमिकेकडे लक्ष
लांडगे गटावर निशाना साधण्यासाठी भाजपच्या निष्ठावंत गटातील शैला मोळक यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महापौर नितीन काळजे यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी तक्रार दिली.  त्याला महापौरांनी कसलेही प्रत्युत्तर दिले नाही. परंतु, या तक्रारीने शहरात खळबळ उडाली आहे. त्यातच पिंपळे सौदागर येथील गोविंद गार्डन चौकात होणा-या सब-वे चे भूमिपूजन गुरूवारी (दि. 5) झाले. हा कार्यक्रम शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर काळजे यांच्या हस्ते होणे प्रोटोकॉलचा भाग ठरतो. मात्र, त्यांना या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले नाही. त्यामुळे महापौरांवरील जगताप गटाचा रोष व्यक्त होताना दिसत आहे. यावर आमदार लांडगे यांचा गट काय भूमिका घेणार? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button