breaking-newsताज्या घडामोडीपुणे

सत्ताधारी भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरा – बाळा नांदगावकर

  • आढावा बैठकीत मनसे कार्यकर्त्यांनी मांडले प्रश्न

पिंपरी – शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरा. यापुढे मी स्वतः आंदोलनात सहभागी होणार आहे. नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी दर तीन महिन्याला आढावा घेणार आहे, अशा सूचना मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची मोट बांधण्यासाठी पिंपरी-चिंचवड मनसेचा आढावा घेण्यासाठी नांदगावकर यांनी आज बुधवारी (दि. 4) शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोरवाडीतील एका हॉटेलमध्ये बैठक घेतली. बैठकीत कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. त्यावर शहराध्यक्ष पद दोन व्यक्तींकडे असल्यामुळे नेमके कोणाच्या नेतृत्वाखाली काम करायचे असा प्रश्न आहे. शहराध्यक्ष सचिन चिखले पालिकेच्या माध्यमातून कार्यरत असल्याचे दिसतात. तर, दुसरे शहराध्यक्ष कैलास जाधव हे कार्यरत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे काम करताना उत्साह राहत नसल्याची तक्रार कार्यकर्त्यांनी केली. शहरात महिला संघटन मजबूत करण्याची गरज आहे. राज्य स्तरावरून पक्षाचे नेते पिंपरीत लक्ष घालत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. राज्य पातळीवरून नेत्याच्या नेतृत्वाची शहराला खरी गरज भासत असल्याची कैफीयत कार्यकर्त्यांनी बैठकीत मांडली. त्यावर नेत्यांनीही भूमिका मांडली. यावेळी शंभर नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नांदगावकर म्हणाले की, शहराला यापुढे एकच शहराध्यक्ष नेमण्यात येईल. एका शहराध्यक्षाचे पद कमी करून महिला अध्यक्ष नेमण्यात येईल. पक्षाची मोट बांधण्यासाठी वकील, डॉक्टर, अभियंते अशा व्यावसायिक युवकांना देखील पक्षात सहभागी करून घेण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी पक्षाचे मन लावून काम करायचे आहे. शहरातील नागरिकांचे जे प्रश्न आहेत. त्यासंदर्भात सत्ताधारी भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा. यापुढे मी स्वतः शहरात लक्ष घालून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करणार आहे. एवढेच नव्हे तर, दर तीन महिन्याला कामाचा आढावा देखील घेणार आहे.

अंतर्गत गटतट बाजुला ठेवा – नांदगावकर
गटबाजीमुळे मनसेत नाराजी असल्याची तक्रार काहींनी केली. त्यावर पक्षांतर्गत गटबाजी बाजुला ठेवा. सर्वांनी एकत्र येऊन पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागा. कारण, आपल्याला पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघनिहाय कामाची जबाबदारी सोपवायची आहे. त्यासाठी कार्यरत तरुणांना काम करण्याची मोठी संधी आहे. उत्साही तरुणांनी हिरिरिने कामाला लागावे, अशाही सूचना बाळा नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button