सगळ्यांच्या आशीर्वादाने सुखरुप: मुख्यमंत्री

निलंगा – मी सध्या निलंग्यातच आहे, मला काही झालेले नाही. डॉक्टरांनी तपासणी केली आहे. शुगर, ब्लड प्रेशर सगळे व्यवस्थित आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सुखरुप आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावल्यानंतर सांगितले.
लातूर दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज (गुरुवार) सकाळी अपघात झाला असून, या अपघातातून मुख्यमंत्री थोडक्यात बचावले. सकाळी निलंगा येथून उड्डाण घेत असताना मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. वीजेच्या तारांना स्पर्श झाल्याने हेलिकॉप्टर कोसळले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह सरकारी अधिकारी हेलिकॉप्टरमध्ये होते. हेलिकॉप्टर जास्त उंचीवर नसल्याने सर्वजण बचावले आहेत.
अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की मी सगळ्यांच्या आशीर्वादाने सुखरूप आहे. काळजी करण्याचे कारण नाही. लातूरमध्ये फडणवीस यांनी श्रमदान करुन तरुणांसोबत संवाद साधला. शिवाय जलयुक्त आणि शेततळ्यांची पाहणीही केली. लातूर दौऱ्यावर असेलेल्या मुख्यमंत्र्यांनी हलगरा हे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हेलिकॉप्टर कोसळले. फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली. यावेळी त्यांच्यासह प्रधान सचिव प्रवीण परदेशी हेलिकॉप्टरमध्ये होते.