Views:
184
कुठल्याही प्रकरणात क्लीन चीट पोलीस किंवा न्याय यंत्रणा देऊ शकते, मग याच प्रकरणी मुख्यमंत्री कसे काय क्लीन चीट देतात
मुंबई – संभाजी भिडेंना रोखा नाहीतर महाराष्ट्रात कठुआ व उन्नावसारख्या घटना घडतील अशी भीती समाजसेवक तुषार गांधी यांनी व्यक्त केली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंचा काय संबंध होता याची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी करताना मुख्यमंत्री त्यांना कशी काय क्लीन चीट देऊ शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
उन्नाव व कठुआ येथे घडलेल्या भयानक घटनांचा दाखला देत तुषार गांधी व माजी पोलीस अधिकारी शिरीष इनामदार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि महाराष्ट्रासह देशामध्ये विखारी विचारसरणी लोकांच्या मनामध्ये भिनवली जात असल्याचा आरोप केला. ज्यावेळी राजकीय उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी अन्य समाजाच्या संदर्भात लोकांच्या मनात विष पेरलं जातं त्यावेळी उन्नाव व कठुआसारख्या घटना घडतात असं इनामदार म्हणाले. त्याचप्रमाणे संभाजी भिडे यांची नि:पक्षपाती चौकशी पोलीस यंत्रणांनी करायला हवी आणि त्याचा अहवाल द्यायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कुठल्याही प्रकरणात क्लीन चीट पोलीस किंवा न्याय यंत्रणा देऊ शकते, मग याच प्रकरणी मुख्यमंत्री कसे काय क्लीन चीट देतात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
भीमा कोरगाव प्रकरणी दोन अडीच महिन्यांपासून वातावरण तापवलं जातं, हजाराच्या वर तरूण जमतात, त्यातलेच 250 जण दुसऱ्या ठिकाणी रवाना होतात आणि या सगळ्याचा गुप्तचर यंत्रणांना पत्ता असू नये हे गुप्तचर यंत्रणांचं अपयश असल्याची टीकाही इनामदार यांनी केली. अशा प्रकारचं अपयश हे महाराष्ट्रातलं पहिलंच असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पश्चिम महाराष्ट्रात हिंदू राष्ट्रवादाचा विखारी प्रसार करण्यात आला असून कठुआ व उन्नावप्रमाणे महाराष्ट्रातही असे प्रकार घडायला नको असतील तर आत्ताच सतर्क रहायला हवं, अशी भीती गांधी यांनी व्यक्त केली आहे. संभाजी भिडे हे अशा प्रचारात अग्रणी असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी अशी आपली ठाम मागणी असल्याचे गांधी म्हणाले. कारवाई राहिली बाजुला भिडेंसारख्यांना राजकीय वरदहस्त लाभत असल्याचे सांगत ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे गांधी म्हणाले.
महाराष्ट्र सरकार जर भिंडेवर कारवाई करत नसेल तर तुम्ही कोर्टाचा मार्ग स्वीकारणार या प्रश्नावर अद्याप तरी असा काही विचार केला नसल्याचे व सध्या अराजकीय व्यक्तिंनी दडपण आणण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
Like this:
Like Loading...