महाराष्ट्र

संजय दत्तविरोधात अजामीनपात्र ‘वॉरंट’; अटकेची टांगती तलवार!

मुंबई: अभिनेता संजय दत्तवर पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार आली आहे. संजय दत्तविरोधात अंधेरी मेट्रोपोलिटन कोर्टाने आज अजामीनपात्र वॉरंट जारी केले. चित्रपट निर्माता शकील नूरानी याला कथित धमकी दिल्याप्रकरणी तसेच चेक बाउन्सप्रकरणी कोर्टात सुनावणीला हजर न राहिल्याने संजयविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.
शकील नूरानीने २००२ मध्ये ‘जान की बाजी’ या चित्रपटासाठी संजय दत्तला साइन केलं होतं. ठरलेल्या रकमेपैकी ५० लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून त्याने संजयला दिले होते. मात्र काही दिवस शूटिंग झाल्यानंतर संजयने मध्येच चित्रपट सोडला. शूटिंगच्या तारखा देण्यास तो टाळाटाळ करू लागला. हे प्रकरण तेव्हा नूरानीने ‘द इंडियन मोशन पिक्चर्स असोसिएशन’कडे (IMPPA) नेलं. संजयने १५ दिवसांच्या आत शूटिंगसाठी ३० तारखा दिल्या नाहीत तर त्याच्याकडून १.५३ कोटी रुपये इतकी नुकसानभरपाई वसूल केली जावी, असा निर्णय नूरानीच्या तक्रारीवर ‘इम्पा’ने दिला होता. त्यानंतर संजयच्या सांगण्यावरून आपणास कराची आणि दुबईतून धमकीचे कॉल येत आहेत, असा आरोपही नूरानीने केला होता. याप्रकरणात तेव्हा संजयला जामीन मिळाला होता.
दरम्यान, ‘इम्पा’चा निर्णय लागू करण्यासाठी नूरानीने नंतर हायकोर्टात धाव घेतली. संजयच्या पाली हिलच्या फ्लॅटवर जप्ती आणावी अशी मागणी त्याने केली होती. मात्र कोर्टाने संजयला दिलासा दिला. संजय ‘इम्पा’चा सदस्यच नसल्याने त्या संघटनेचा निर्णय त्याला लागू होत नाही, असे कोर्टाने नमूद केले होते. त्यानंतर चेक बाऊस व धमकी प्रकरणी नूरानी अंधेरी कोर्टात गेला आहे. तिथे आज झालेल्या सुनावणीला संजय गैरहजर राहिल्याने कोर्टाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button