breaking-newsपुणेमहाराष्ट्र

“श्री साई संस्थान शिर्डी’ यांच्याकडून कुंभमेळ्याच्या वस्तू खरेदीत 66 लाख रुपयांचा घोटाळा – हिंदु जनजागृती समितीचा आरोप

  • चौकशीची मागणी

पुणे – सन 2015 मध्ये नाशिक येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिर्डीच्या “श्री साई संस्थान’ यांच्याकडून गर्दीच्या नियोजनासाठी खरेदी करण्यात आलेले साहित्य चढ्या दराने खरेदी करण्यात आले आहे. यामध्ये 66 लाख 55 हजार 997 रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असतानाही काहीच कारवाई करण्यात आली नाही. या खरेदीची उच्चस्तरिय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
समितीचे राज्याचे संघटन सुनील घनवट यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. यावेळी संघटनेचे अधिवक्ता मोहन डोंगरे, पराग गोखले आदी उपस्थित होते.
“श्री साईबाबा संस्थान’च्या बेहिशेबी कारभारावर शासनाचे नियंत्रण नाही, सिंहस्थ संपल्यावर आलेल्या वस्तूंचे दायित्त्व कोणाचे, शिर्डी संस्थानच्या निधीतून “निलवंडे धरण-कालवा’ प्रकल्पासाठी दिलेल्या पाचशे कोटी रुपयांची चौकशी करण्याची मागणीही घनवट यांनी केली आहे. माहिती अधिकारातून त्यांनी ही माहिती मिळवली आहे.
2015 च्या नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीच्या नियोजनासाठी पोलिसांच्या मागणीनुसार सुरक्षा साहित्य खरेदी केले. अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या अंदाजित दरांपेक्षा प्रचंड चढ्या दराने हे साहित्य खरेदी केल्याचे माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीतून स्पष्ट होते, असे घनवट यांनी सांगितले.
साठ हजार रुपयांचा मनीला रोप (दोर) हा 18 लाख 50 हजार रुपयांना खरेदी करण्यात आला. 400 रुपये प्रती नग असलेल्या “रिचार्जेबल टॉर्चेस’ प्रती नग तीन हजार रुपयांना तर दोन हजार रुपयांचा “साईन बोर्ड’ नऊ हजार 200 रुपयांना तर पाच हजार रुपयांची ताडपत्री 22 हजार 575 रुपये इतक्‍या चढ्या दराने खरेदी केली गेली.
या खरेदी व्यवहारात चढ्या दरापोटी 66 लाख 55 हजार 997 रुपये अधिक खर्च करण्यात आले आहे. या प्रकरणी 16 डिसेंबर 2016 या दिवशी श्री साईबाबा संस्थान यांना स्पष्टीकरण मागणारे पत्र महाराष्ट्र सरकारने पाठवले होते. हे पत्र पाठवूनही सव्वावर्ष उलटले आहे. असे असतानाही मुख्यमंत्र्यांकडून कोणतीच कार्यवाही अथवा चौकशी करण्यात आली नसल्याचा आरोप घनवट यांनी केला आहे.
या वस्तूंशिवाय आणखी बऱ्याच वस्तू संस्थानकडून देण्यात आल्या होत्या. त्या वस्तू संस्थानने पुन्हा जमा करून घेतल्या नसल्याचे घनवट म्हणाले.
गेल्या 45 वर्षापासून रेंगाळलेल्या अहमदनगर जिल्ह्यातीन “निळवंडे धरण आणि कालवा’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी शिर्डी संस्थानच्या निधीतून 500 कोटी रुपये संमत केले. हा निधी सर्व नियम डावलून संमत करण्यात आला. निळवंडे धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रात शिर्डी गाव येत नसूनही “श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट कायदा 2004′ चा भंग केल्याचा आरोप गोखले यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button