शेतकऱ्यांचे आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठीच

- केंद्रीय कृषी मंत्र्यांचे वादग्रस्त विधान
- शेतकरी आंदोलनाचा दुसरा दिवस
पाटणा – शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रत्येकजण काहीतरी अस्वाभाविक कृती करत आहे, असे राधामोहन सिंह यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने शेतकऱ्याच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
देशभरात किमान 12 ते 14 कोटी शेतकरी आहेत. प्रत्येक शेतकरी संघटनेमध्ये स्वाभाविकपणे 10 ते 20 हजार शेतकरी सदस्य असतात. त्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांना काही तरी अस्वाभाविक कृती करायला लागते, असे राधामोहन सिंह म्हणाले. मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्वात जास्त काम केले जात आहे. अनेक योजना राबवल्या जात आहेत. देशातील अनेक कोटींच्या घरात असणाऱ्यापैकी काही शेतकरी आंदोलन करत आहेत, असेही ते म्हणाले.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही “हे आंदोलन कोणत्याही मुद्दयाविना आहे’, अशा शब्दात या 10 दिवसांच्या शेतकरी आंदोलनावर टीका केली आहे. “शेतकऱ्यांच्या आंदोलनाला कोणताही हेतू किंवा मुद्दा नाही. हे आंदोलन पूर्णपणे अनावश्यक आहे.’ असे खट्टर म्हणाले. या आंदोलनकाळामध्ये शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकता येणार नाही. त्यामुळे आंदोलनामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे. शेतीमाल विकला जाणार नाही, असे म्हटल्यामुळे केवळ शेतकऱ्यांचेच नुकसान होणार आहे, असे खट्टर म्हणाले.
तर मध्यप्रदेशचे कृषीमंत्री बालकृष्ण पाटिदार यांनी या आंदोलनात मध्यप्रदेशातील कोणीही शेतकरी सहभागी नसल्याचा दावा केला आहे. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांवर शेतकरी समाधानी अस्लयाचेही ते म्हणाले.
या 10 दिवसांच्या आंदोलनामध्ये सुमारे शेतकऱ्यांचे 100 गट सहभागी झाले आहेत. शेतीकर्ज पूर्णपणे माफ करणे आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी आदी मागण्या या संपादरम्यान अखिल भारतीय किसान महासंघाने केल्या आहेत. या आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या मध्यप्रदेशातील मंदसोर येथे धरणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी गावकऱ्यांना खीर वाटली. मात्र शेतमाल विकणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
मंदसोर आंदोलनाच्या स्मरणार्थ…
देशभरातील 8 राज्यांमधील शेतकऱ्यांनी शुक्रवार सकाळपासून 10 दिवसांच्या आंदोलनाला सुरूवात केली आहे. मध्यप्रदेशात मंदसोर येथील शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस गोळीबारामध्ये 6 शेतकरी मरण पावले होते. त्या आंदोलनाच्या पहिल्या स्मृतीप्रित्यर्थ हे आंदोलन छेडण्यात आले आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पंजाब. राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, हरियाणा आणि छत्तीसगड या राज्यांमधील शेतकऱ्यांनी शेतीमालाची विक्री करण्याचे थांबवले आहे. त्यामुळे आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी भाज्यांचे भाव वधारल्याचे चित्र आहे.