शेतकरी संपाचा दुसरा दिवस, भाजीपाल्याचे दर दुप्पट!

मुंबई : शेतातल्या भाज्या आणि हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून देशभरातील शेतकऱ्यांनी दहा दिवसांच्या ‘गाव बंद’ आंदोलनाला शुक्रवारी सुरुवात केली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतीमालाला किमान हमीभाव आणि दरमहा निश्चित उत्पन्नाची खात्री या मागण्यांसाठी देशातील शेतकरी मैदानात उतरले आहेत.
१० जूनपर्यंत पुढील दहा दिवस हे आंदोलन सुरू राहील. गेल्या वर्षी झालेल्या शेतकरी आंदोलनांनंतर सरकारने दिलेली आश्वासने हवेतच विरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये फसवणूक आणि संतापाची भावना आहे. या काळात शहरांत दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठा केला जाणार नाही. शुक्रवारी अनेक ठिकाणी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून आणि भाजीपाला रस्त्यावर टाकून शेतकऱ्यांनी आपल्या संतापाला वाट करून दिली. गेल्या वर्षीच्या संपाची सुरवात जेथून झाली, त्या पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी काळी गुढी उभारून सरकारच्या धोरणांचा निषेध केला.