breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शुभम शिर्के अपहरण, खूनप्रकरणी जन्मठेप

पुणे- दिघी भागात शुभम शिर्के या शाळकरी मुलाचे खंडणीसाठी अपहरण करुन खून केल्याप्रकरणी आरोपीला विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

अमित रामचंद्र नायर (वय २०,रा. आपटे कॉलनी, भोसरी) असे शिक्षा सुनावलेल्याचे नाव आहे. दहावीतील शुभम शिर्के (वय १५)चे  अपहरण करुन खून केल्याचा प्रकार ३१ मार्च २०१२ रोजी उघडकीस आला होता. पोलीस तपासात अमित नायर आणि त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदारांनी खून केल्याचे निष्पन्न झाले होते. अरोपी अमित आणि शुभम भोसरी परिसरात राहायला होते. अमितच्या एका मित्राने त्याच्या  आई-वडिलांकडे शिरगाव येथे साईबाबा मंदिरात निघालो असल्याची बतावणी केली होती. अमित आणि त्याचे अल्पवयीन साथीदार मोटारीतून निघाले. त्यांनी शुभमला  शिरगावला दर्शनासाठी निघालो असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शुभमला घेऊन ते दिघीत आले. लष्कराच्या ताब्यात असलेल्या जागेत ते शुभमला घेऊन गेले. त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. अमित व अल्पवयीन मित्रांनी शुभमच्या वडिलांच्या मोबाइलवर संपर्क साधला आणि शुभमचे अपहरण केल्याची माहिती दिली. शुभमच्या सुटकेसाठी पन्नास हजारांची खंडणी द्या, अशी धमकी त्यांनी दिली होती.

शुभमचे वडील रक्कम घेऊन भोसरी भागात गेले. तेथील एका हॉटेलमध्ये अमित तोंडाला रुमाल बांधून थांबला होता. शुभमच्या वडिलांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलीस त्यांच्याबरोबर होते. पोलिसांनी अमित व  अल्पवयीन साथीदारांना पकडले होते. या खटल्यात विशेष सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम  यांनी बाजू मांडली. परिस्थितीजन्य पुरावे तसेच साक्षीदारांनी दिलेली साक्ष ग्राह्य़ धरुन विशेष न्यायालयाने अमित नायरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.  आरोपीला ठोठाविलेल्या दंडाच्या रकमेतील पंधरा हजारांची रक्कम शुभमच्या आई-वडिलांना देण्याचे आदेश दिले. तसेच गुन्ह्य़ात जप्त केलेली रक्कम त्यांना देण्याचे आदेश दिले. याप्रकरणातील अल्पवयीन आरोपींविरुद्ध दाखल खटल्याची सुनावणी सुरु आहे.

मालिका पाहून अपहरण व खून

शुभम एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहावीत शिकत होता. दहावीच्या परीक्षेत तो चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला होता.आरोपी अमित आणि त्याच्या अल्पवयीन साथीदारांनी दूरचित्रवाहिनीवरील मालिका पाहून शुभमचे अपहरण करुन निर्घृण पद्धतीने खून केला. आरोपी अमित याला खून, कट रचणे, अपहरण या कलमांखाली दोषी धरून शिक्षा सुनावण्यात आली आहे

शुभम शिर्के खून खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. परिस्थितीजन्य पुरावे  सरकारपक्षाकडून न्यायालयाकडे सादर करण्यात आले. या खटल्यात सतरा परिस्थितीजन्य पुरावे सादर करण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य़ धरुन न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.  – अ‍ॅड. उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button