breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिवसेनेच्या आमदार-खासदारांचे शीतयुद्ध

पिंपरी विधानसभा अध्यक्ष नियुक्तीचा तिढा

पिंपरी- शिवसेनेच्या पिंपरी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून पक्षातील आमदार-खासदारांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. त्यातच, शहरप्रमुखाने तिसरेच नाव पुढे आणल्याने आणखी भर पडली आहे. कोणत्याही नावावर एकमत होत नसल्याने अद्याप याबाबतची घोषणा होऊ शकलेली नाही.

पिंपरी विधानसभेच्या अध्यक्षपदाची धुरा यापूर्वी योगेश बाबर यांच्याकडे होती. तथापि, राहुल कलाटे यांनी शहरप्रमुख सोडल्यानंतर त्या जागेवर बाबर यांना ‘पदोन्नती’ देण्यात आली. खासदार श्रीरंग बारणे यांनी बाबर यांच्या नावाची शहरप्रमुखपदासाठी शिफारस केली होती. त्यानंतर, पिंपरी विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी २८ फेब्रुवारी २०१८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. खासदार बारणे यांच्या मध्यस्थीने त्यांनी नवा घरोबा केला. शिवसेनेकडून पिंपरी विधानसभेच्या उमेदवारीसाठी ते इच्छुक आहेत. आगामी लोकसभेचे गणित लक्षात घेऊन बारणे यांनी ननावरे यांच्या नावाची शिफारस केली आहे.

त्याचवेळी, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेचे पिंपरीचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. चाबुकस्वारांचा ननावरे यांच्या नावाला तीव्र विरोध आहे. ननावरे आगामी काळात ‘आमदारकी’साठी इच्छुक होऊ शकतात. पुढे जाऊन नस्ती डोकेदुखी नको म्हणून चाबुकस्वारांना ननावरे आतापासूनच नको आहेत. या नियुक्तीवरून बऱ्याच दिवसांपासून आमदार-खासदारात शीतयुद्ध सुरू आहे. हा वाद वरिष्ठ नेत्यांपर्यंत गेला असून तूर्त कोणताही तोडगा निघाला नाही. त्यातच, शहरप्रमुख बाबर यांनी रोमी संधू यांचे नाव पुढे आणले आहे. तथापि, संधू यांच्या नावाला कोणाचेही समर्थन मिळू शकलेले नाही. संघटनात्मक पातळीवर विशेषत: पिंपरी विधानसभेच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपला जवळचा माणूस तेथे बसावा, अशी प्रत्येकाची भावना आहे. त्यासाठीच शिवसेना नेत्यांचे शीतयुद्ध सुरू असल्याचे पक्षवर्तुळात मानले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button