breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिरूर बाजार समितीत राष्ट्रवादीचा 13 जागांवर विजय

शिरूर : शिवसेनेसह मित्रपक्षांना बरोबर घेऊन “तुल्यबळ’ पॅनेल दिल्याचा दावा केलेल्या भारतीय जनता पक्षाची हवा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (जि. पुणे) निवडणुकीत गेली.

आज निकाल जाहीर झालेल्या सतरा पैकी तब्बल 13 जागा मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत “शेतकरी विकास पॅनेल’ ने बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. भाजप पुरस्कृत “शेतकरी सहकार विकास पॅनेल’ ला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले.

पणन प्रक्रिया मतदार संघातून बाबासाहेब सासवडे व ग्रामपंचायत मतदार संघातील आर्थिक दुर्बल घटक प्रतिनिधी मतदार संघातून सौ. तृप्ती संतोष भरणे यांची बिनविरोध निवड झाली असून, ते दोघेही “राष्ट्रवादी’ कॉंग्रेसचे असल्याने राष्ट्रवादीच्या बाजार समितीतील संचालकांची संख्या पंधरा झाली आहे.

बाजार समितीच्या एकूण 19 जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्यानंतर काल उर्वरित 17 जागांसाठी उत्साहात मतदान झाले.

येथील साई गार्डन मंगल कार्यालयात मतदान झालेल्या 17 जागांची मतमोजणी करण्यात आली. सकाळी 9 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरवात झाली. सुरवातीला कृषी पतसंस्था मतदार संघातील सर्वसाधारण सात जागांसाठीची, त्यानंतर याच मतदार संघातील महिलांसाठी राखीव असलेल्या दोन जागांची; तसेच इतर मागास प्रवर्ग व भटक्‍या विमुक्त जाती जमाती मतदार संघातील प्रत्येकी एका जागेची मतमोजणी करण्यात आली.

या मतमोजणीसाठी केंद्रनिहाय सात टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती. याच मतमोजणीसोबत स्वतंत्र आठव्या टेबलवर व्यापारी मतदार संघाची मतमोजणी करण्यात आली. ही मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सात टेबलवरून प्रथम ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण दोन जागांसाठीची व त्यानंतर याच मतदार संघातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाची मोजणी करण्यात आली.

त्याचवेळेस स्वतंत्र आठव्या टेबलवर हमाल तोलारी मतदार संघाची मतमोजणी करण्यात आली. तीन वाजता मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा जाधव यांनी निकाल जाहीर केले.

कृषी पतसंस्था (सोसायटी) मतदार संघाच्या खुल्या सात जागांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याठिकाणी अपेक्षेप्रमाणे “राष्ट्रवादी’ च्या पॅनेलने बाजी मारली. “राष्ट्रवादी’ च्या शेतकरी विकास पॅनेलचे शशिकांत दसगुडे (908 मते), प्रकाश पवार (852 मते), शंकर जांभळकर (818 मते), ऍड. वसंतराव कोरेकर (761 मते) व विश्‍वास ढमढेरे (751 मते) हे विजयी झाले; तर भाजप पुरस्कृत “शेतकरी सहकार विकास पॅनेल’ चे राहुल गवारे हे 818 व संतोष मोरे हे 672 मते मिळवून विजयी झाले.

“राष्ट्रवादी’ च्या बाबाजी निचित (560 मते) व शिवाजी वडघुले (625 मते) यांना; तर भाजपच्या आनंदराव हरगुडे (625 मते), तात्यासाहेब सोनवणे (621 मते), अशोक माशेरे (605 मते) व ऍड. देवराम धुमाळ (594 मते) यांना पराभव पत्करावा लागला.

सोसायटीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या दोन जागांमध्ये समान वाटणी झाली. एक जागा “राष्ट्रवादी’ च्या; तर एक जागा भाजपच्या पारड्यात पडली. भाजपच्या छायाताई संभाजी उर्फ अप्पासाहेब बेनके या 857 मते मिळवून; तर “राष्ट्रवादी’ च्या मंदाकिनी जालिंदर पवार 749 मते मिळवून विजयी झाल्या. भाजपच्या सुजाता शंकर गाजरे (626 मते) व “राष्ट्रवादी’ च्या कौसल्या पोपटराव भोर (676 मते) यांचा पराभव झाला.

ज्या जागेवरून “राष्ट्रवादी’ च्या पॅनेलमध्ये काहीसा बेबनाव झाला होता, त्या इतर मागास प्रवर्गातील जागा मात्र “राष्ट्रवादी’ ला गमवावी लागली. येथून भाजपचे विकास शिवले हे सुमारे 824 मते मिळवून विजयी झाले.

त्यांनी “राष्ट्रवादी’ च्या संदीप गायकवाड यांचा पराभव केला. गायकवाड यांना 622; तर याच मतदार संघातील अनिल भुजबळ यांना केवळ 32 मते मिळाली. याच मतदार संघातील भटक्‍या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून “राष्ट्रवादी’ च्या सतीश कोळपे यांनी भाजपच्या डॉ. हेमंत पवार यांचा पराभव केला. कोळपे यांना 772; तर डॉ. पवार यांना 673 मते पडली.

ग्रामपंचायत मतदार संघातील दोन खुल्या व अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाच्या एका जागेवरही “राष्ट्रवादी’ ने वर्चस्व मिळविले. दोन्ही पॅनेलमधील दिग्गजांच्या उमेदवारीमुळे हा मतदार संघ “लक्ष्यवेधी’ झाला होता. “राष्ट्रवादी’ चे मानसिंग पाचुंदकर हे 689 व धैर्यशील उर्फ आबाराजे मांढरे हे 481 मते मिळवून मोठ्या फरकाने विजयी झाले.

भाजपचे अनिल नवले (454 मते) व संभाजी कर्डिले (189 मते) यांना पराभव पत्करावा लागला. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून “राष्ट्रवादी’ च्या विजेंद्र गद्रे यांनी भाजपच्या तुकाराम थोरात यांचा पराभव केला. गद्रे यांना 669; तर थोरात यांना केवळ 339 मते मिळाली.

व्यापारी मतदार संघातून प्रवीण चोरडिया (344 मते) हे विद्यमान संचालक व सुदीप गुंदेचा (268 मते) हे विजयी झाले. त्यांनी हरीश रूणवाल (265 मते) व सुरेश बोरा (235 मते) यांचा पराभव केला.

हमाल तोलार मतदार संघातून बंडू खंडू जाधव हे 70 मते मिळवून विजयी झाले. या ठिकाणाहून कुंडलिक दसगुडे (69 मते), विठ्ठल दसगुडे (67 मते), बबन शिंदे (दोन मते) व उमेश दसगुडे (शून्य मते) हे पराभूत झाले.
दुपारी तीन वाजता सर्व मतदार संघांचे निकाल जाहीर होताच “राष्ट्रवादी’ च्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची मुक्त उधळण करीत, फटाक्‍यांची आतषबाजी केली.

राष्ट्रवादीचे चिन्ह असलेले झेंडे नाचवत जल्लोष केला. माजी आमदार ऍड. अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे यांना खांद्यावर उचलून घेत कार्यकर्त्यांनी शरद पवार झिंदाबाद, अजित पवार झिंदाबादच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button