breaking-newsराष्ट्रिय

शिमलात जलसंकट गडद : पर्यटकांनो, इथे येऊ नका!

  • तहानलेल्या शिमलावासियांची विनंती 

शिमला – भारतासह जगभरात प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील पाणी समस्या गंभीर बनली आहे. शिमलामधील पाणी संकट पाहता आता स्थानिक नागरिक पर्यटकांना शिमल्यात न येण्याची विनंती करत आहेत. पर्यटकांनी शिमल्यात न येता दुसऱ्या ठिकाणी जावे, कारण इथे पाण्याचा फारच तुटवडा आहे, अशाप्रकारच्या पोस्ट नागरिक सोशल मीडियावर करत आहेत.

“शिमलामध्ये गरजेपुरते लागणारे पाणीही उपलब्ध नाही. आंघोळीसाठीचे पाणी सोडाच पण पिण्यासाठीही आवश्‍यक पाणी मिळत नाही. शिमल्यात आम्हाला पाणी नाही. कृपया शिमल्यात न येता दुसऱ्या पर्यटन स्थळाला जावे, अशी पोस्ट एकाने सोशल मीडियावर टाकली आहे. 25 हजार नागरिकांच्या हिशेबाने शिमला शहर वसवण्यात आले होते. शिमला नगरपरिषदेनुसार, शहराची लोकसंख्या आता 1.72 लाखांवर पोहोचली आहे. याशिवाय उन्हाळ्यात इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या एक लाखांपेक्षा जास्त असते. पर्यटकांची संख्या वाढल्याने इथे दरदिवशी 45 एमएलडी (मिलियन लिटर्स पर डे) पाण्याची मागणी वाढते.

“सरकारने नियमावली जारी करुन शिमला न येण्यास सांगायला हवे. इथल्या स्थानिकांना पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत इथे येऊन पर्यटकांनी आणखी अडचणी वाढवू नये, असा सल्ला एकाने दिला आहे.
पाणी संकटाचा सामना करत असलेल्या शिमलामध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपाल वगळता सर्व व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यावर बंदी घातली आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत इमारती तसेच इतर बांधकाम बंद राहिल. याशिवाय शहरातील कार वॉशिंग सेंटरवरही बंदी घातली आहे.

30 रेस्टॉरंट बंद 
शिमलात काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या जाणवत असल्याने शहरातील 30 रेस्टॉरंट बंद करण्यात आली आहेत. शहरातील अनेक हॉटेल मालकांनी बुकिंग घेणे बंद केले असून काही जणांनी बुकिंग रद्द केले आहेत. यामुळे येथे आलेल्या पर्यटकांची गैरसोय होत असून त्यांना राहण्याची आणि खाद्यपदार्थांच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button