शालेय पोषण आहार शंभर टक्के गॅसवर शिजवा

- शालेय शिक्षण विभागाच्या सूचना
पुणे– शाळांना गॅसजोडणीसाठी अनुदान देऊनही अनेक शाळा या चुलीवर शालेय पोषण आहार शिजवताना दिसत आहे. त्यामुळेच येत्या काळात सर्व शाळांमधील पोषण आहार हा गॅसवर शिजवा असे आदेश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयातील संचालक सुनिल चौहान यांनी दिले आहेत.
चौहान यांनी याबाबत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे राज्यातील शाळांना पटसंख्येप्रमाणे गॅसजोडणीसाठी अनुदान देण्यात आले आहे. साधारण एका शाळेसाठी साडेतीन हजार रुपये अनुदान गॅस जोडणीसाठी गेल्या वर्षीपासून देण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्याव्यतिरिक्त जे आवश्यक अनुदान आहे ते शालेय खर्चातून भागवावे किंवा लोकसहभाग मिळवावा असेही आदेश दिले आहेत. मात्र तरीही राज्यात अद्याप शंभर टक्के गॅस जोडणी झालेली नाही. त्यामुळेच येत्या काळात किती शाळा गॅसवर अन्न शिजवतात, किती शाळा अद्याप चुलीचाच आधार घेतात याचा सविस्तर अहवाल पाठवा अशा सूचनाच चौहान यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात सर्व शाळांना एलपीजी गॅस जोडणी करणे गरजेचे झाले आहे.