शहरात कुठेही वृक्ष लावा ; पण प्रभागातील नगरसेवकाला माहिती देवून स्वाक्षरी घ्या

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात प्रभागात, रस्त्यांच्या बाजूला, चाैकाचाैकात वृक्ष लागवड करण्यात आल्यानंतर तातडीने त्या-त्या प्रभागातील नगरसेवकाला वृक्ष रोपणाची माहिती द्यावी, तसेच संबंधित नगरसेवकांची त्या अधिका-याने स्वाक्षरी घेण्यात यावी, असा निर्णय वृक्ष प्राधिकरण समिती बैठकीत घेण्यात आला.
महापालिकेतील स्थायी समिती सभागृहात वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक पार पडली. यावेळी भाऊसाहेब भोईर, श्याम लांडे, शीतल शिंदे, विलास मडिगेरी, तुषार हिंगे, संतोष लोंढे, नवनाथ जगताप, साधना मळेकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, मुख्य उद्यान अधीक्षक सुरेश साळुंखे आदी उपस्थित होते.
यंदा वार्षिक नियोजन करून रोपांची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी कृती आराखडा बनविण्यात येणार आहे. रोपांची लागवड करताना तज्ज्ञांची मते विचारात घेण्यात येणार आहेत. रोपांची जपणूक करण्यासाठी वृक्षमित्र नेमले जाणार आहेत. त्यांना महापालिकेचे ओळखपत्र दिले जाईल. त्यांच्याकडे रोपांच्या संगोपनाची जबाबदारी राहिल. त्यासाठी सोमवारी (दि. २८) आॅटो क्लस्टर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्यान व वृक्षसंवर्धन विभागामार्फत या वर्षी ६० हजार रोपे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठीचा वार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे. महापालिका उद्यान, रस्त्याच्या बाजूला, मोकळ्या जागा, स्मशानभूमी, दफनभूमी, मैदाने, शाळा, धार्मिक ठिकाणी १२ हजार ३०३ रोपे, विकसित व विकसनशील उद्याने, रेल्वे लाईनच्या कडेने, मेट्रो लाईनच्या बाजूने चार हजार, लष्करी हद्दीमध्ये ३० हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. याविषयी भाऊसाहेब भोईर म्हणाले, महापालिकेत नेहमीच वृक्ष प्राधिकरण समितीला दुय्यम स्थान दिले जाते. परंपरेप्रमाणे केवळ रोपे खरेदी करून लागवड केली जाते. परंतु, त्याची फलनिष्पत्ती दिसत नाही. रोपे खरेदी आणि लागवडीच्या संख्येत तफावत आढळते, असे त्यांनी यावेळी सांगितले.