शहरात अवकाळी पाऊसाची दमदार एॅन्ट्री ; 20 झाडे उन्मळून पडली

पिंपरी – शहरात अवकाळी पावसाने आज (शुक्रवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास दमदार एॅन्ट्री केली. वादळी वा-यासह ठिकठिकाणी गाराचा पाऊस पडला. शहरातील अनेक भागात जोराच्या वा-यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. तसेच पाऊस सुरु झाल्याने तब्बल चार तास विज गायब झाली होती. अचानक झालेल्या पाऊसाने अनेक ठिकाणी पाणी साचून झोपडपट्टी भागात पाणी घरात घुसले होते. तर काही ठिकाणी गटारी तुंबल्याचे निर्दशनास आले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात सकाळपासूनच नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होवू लागली होती. दुपारी साडेतीन वाजता उष्णतेमुळे वरुण राजाची दमदार हजेरी झाली. जोरदार वा-यामुळे नाशिक फाट्याजवळ सीआयआरटी रोडवर एक, संत तुकारामनगरमध्ये आठ, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीजवळ रेल्वे लाईन लगत एक, निगडी प्राधिकरणात एक, डेअरी फार्म येथे तीन ते चार, पिंपळेसौदार येथे एक मोठे झाड उन्मळून पडले आहे. संभाजीनगर, पिंपरीगाव, साई चौकाजवळ आणि वाकड मधील दत्त मंदिराजवळ झाडे पडली आहेत. अशा 23 ते 25 ठिकाणी झाडे पडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन विभागाला घटनांची माहिती मिळताच तात्काळ रस्त्यांवरील झाडे हटविण्याची कारवाई करण्यात आली. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी वाहतुकीला अडथळा झाला नाही.
दरम्यान, मिलिंदनगर येथे गटारी तुंबल्यामुळे पहिल्याच पावसात पाणी घरामध्ये शिरले. त्यामुळे ‘पाणी घरात आणि रहिवासी दारात’ अशी परिस्थिती दिसून आली. लहान-मोठ्या गटारी आणि नाले पावसाळ्यापूर्वीच स्वच्छ करणे आवश्यक असते. नाले स्वच्छ झाल्याचा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे.